वत्सला प्रतिष्ठान लोकसाहित्यासाठी आदर्श ठरेल

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर

द्रोपदी कुंभार स्मृती लोकसाहित्य पुरस्कारांचे वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : मौखिक लोकसाहित्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. आज हे मौखिक लोकसाहित्य लोप पावत आहे. या मौखिक लोकसाहित्याने कृषी संस्कृतीमध्ये वेदना निराकारणाचे काम केले आहे. या लोकसाहित्यावरच गावगाड्याची एकी टिकून होती. काळानुसार बदल होत गेले त्यानुसार लोकसाहित्य लोप पावत गेले. त्यामुळे समाज विस्कळीत झाला. लोकसाहित्याच्या माध्यमातून एकत्रित येऊन साजरे होणारे सण उत्सव मागे पडले. समाज विस्कळीत झाला. या लोककला आपण सक्षमपणे पुढील पिढीकडे हस्तांतरित करू शकलो नाही. म्हणूनच या लोककलांपासून आजची पिढी लांब राहिली. त्यांना या लोककलांशी काही देणे घेणे राहिले नाही. कामापुरता लोककलांचा उपयोग केवळ औपचारिकपणा राहिला. भविष्य काळामध्ये या लोककला वृद्धिंगत होण्याऐवजी नष्ट होत गेल्या तर समाजाचे काळजी घेणारा समाजाचा संघपणा आहे. तो कधीच टिकून राहणार नाही. अशा या लोककला लुप्त होणाऱ्या काळामध्ये व वत्सला प्रतिष्ठान सारखं प्रतिष्ठान या लोककला विषयी जागरूकता निर्माण करून संशोधन आणि संवर्धनासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देत आहेत ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. भविष्य काळामध्ये केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोककला आणि लोकसाहित्याचे जतन वत्सला प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत. गेल्यास व वत्सला प्रतिष्ठान लोकसाहित्यासाठी आदर्श ठरेल. कोणतीही चांगली गोष्ट धाडसाने सुरू करणे महत्त्वाचे असते. आज ज्या पद्धतीने वत्सला प्रतिष्ठानने हा कार्यक्रम घडवून आणून लोकसाहित्य संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आहे त्या संवर्धन संदेशाला आपण सर्वांनीच पुढील काळामध्ये पाठिंबा देऊन या लोककला विषयी संवर्धन करण्याचे काम करूया. केवळ संशोधन आणि संवर्धनासाठी पुरस्कार देऊन चालणार नाही; तर वत्सला प्रतिष्ठानने खेडोपाड्यात तळागाळातील लोकांमध्ये, कष्टकरी समाजामध्ये अजूनही ज्या ज्या ठिकाणी या लोककला तग धरून आहेत त्यांना लोकसाहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये आणून या लोककला जगासमोर आणल्या पाहिजेत. आज गोव्यातील प्राध्यापक पौर्णिमा केरकर आणि डॉक्टर गोविंद काजरेकर सारखी मंडळी; त्याचबरोबर आज लोकसाहित्य संशोधनाचा पुरस्कार वत्सला प्रतिष्ठान देत आहे ते मोहन रणसिंग ही सर्व मंडळी आपला वेळ देऊन या संशोधन कार्यामध्ये गुंतली आहेत, त्यांचे खरोखरच अभिनंदन केले पाहिजे. माझी कोणीतरी दाद घ्यावी, मी केलेल्या संशोधनाला कुठेतरी दाद मिळावी अशी कोणतीही भावना मनात न ठेवता केवळ हे लोकसाहित्य लिखित स्वरूपात कायमस्वरूपी टिकले पाहिजे या विचारांमुळेच

ही मंडळी काम करत आहेत. त्यांचं मी खरोखरच अभिनंदन करतो. मोहन कुंभार आणि त्यांचे कुटुंबीय हे केवळ आईच्या स्मृती म्हणून ही गोष्ट घडवून आणत असले तरी याला एक अनन्य साधारण महत्व आहे. त्यांना सहकार्य करून आपण त्यांच्या या कार्याला सार्वत्रिक स्वरूप दिल्यास लोक साहित्याच्या बाबती एक महत्त्वाचं काम सिंधुदुर्गमध्ये उभे राहील. असे प्रतिपादन मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांनी वत्सला प्रतिष्ठान च्या लोकसाहित्य पुरस्कार वितरण समारंभ वेळी गोपुरी, कणकवली येथे केले. यावेळी विचार मंचावर लोकसाहित्य संशोधक, अभ्यासक व साहित्यिक प्राचार्य डॉ. गोविंद का, गोव्यातील लोकसाहित्य अभ्यासक, संशोधक प्राध्यापक पौर्णिमा केरकर, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, गोपुरी आश्रम चे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, नामवंत चित्रकार नामानंद मोडक व वत्सला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता कुंभार उपस्थित होत्या. प्राध्यापक बांदेकर पुढे म्हणाले, आजचा काळ हा माणसाला माणसापासून तोडणारा काळ आहे. या काळात लोकसाहित्याच्या माध्यमातून माणसं माणसांना जोडू शकील अशी ताकद लोकसाहित्यात आहे. माणसाचा प्रवास हा माणसाकडून माणसाकडेच असायला हवा. वत्सला प्रतिष्ठानने ही एक चांगली सुरुवात केली आहे. त्याला आपण सगळ्यांनीच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. या गोष्टी एकट्या दुकट्याच्या नसून, सामूहिक प्रयत्नानेच आपण लोक साहित्याची जोपासना करू शकतो. दशावतारासारखी एक महत्त्वाची लोककला जत्रांच्या निमित्ताने का होईना टिकून आहे. दशावताराला समाजामध्ये वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. ठाकर लोककलाही त्याच मानसिकतेने पुढे आणणे गरजेचे आहे. वत्सला प्रतिष्ठानने ठाकर समाजातील लोककलावंत आणि संशोधकांना इथे आपल्यासमोर सन्मानित केले यातच वत्सला प्रतिष्ठानच्या कार्याची पावती मिळते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांनी केले. कणकवली, वरवडे येथील लोककलावंत स्नेहलता सुनील सावंत यांच्या लोकगीत गायनाने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन मोहन रणसिंग यांना लोकसाहित्य संशोधनातील पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले १९७७ पासून मी या ठाकर लोककलेवर संशोधनात्मक काम करत आहे. या काळामध्ये एक दोन संस्था सोडल्या तर तशी कोणीही या संशोधनाबाबतीत माझ्या संशोधनात्मक कामकाजाची दखल घेतली गेली नाही. मला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण वत्सला प्रतिष्ठानने मला या ठिकाणी सन्मानित केले याचे मला खरोखरच मनापासून समाधान आहे. मी माझे काम सातत्याने चालू ठेवले आहे तरीही या वयात माझा सत्कार होईल अशी कोणतीही अपेक्षा मी ठेवली नव्हती. काम करत राहणे हीच माझी मन भावना असल्यामुळे मला आज हा पुरस्कार स्वीकारताना मनापासून आनंद होत आहे. यावेळी त्यांनी आपण केलेल्या संशोधनाची पूर्वपीठिका मांडली. प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्काराचे म्हणून त्यांना देण्यात आलेली रक्कम त्यांनी देणगी म्हणून प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांचे कडे सुपूर्द केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, ठाकर समाजाचा संघटनात्मक काम करताना मला तुझ्या आर्थिक अडचणी आल्या होत्या त्याच आर्थिक अडचणी या येत असणार याची मला ठाम खात्री आहे. मी आज निवृत्त आहे आयुष्यात खूप समाधानी आहेत आणि म्हणूनच माझा खारीचा वाटा म्हणून ही रक्कम मी प्रतिष्ठानकडे सुपूर्द करीत आहे, याचे मला मनस्वी समाधान आहे. संघटना सुरू करणे सोपे असते पण ते आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या चालवणे तितकेसे सोपे नाही याची जाण मला आहे.

लोकसाहित्य संवर्धनाचा पुरस्कार यावेळी सिंधुदुर्गतीलच ठाकर लोककला संवर्धक शिवदास मसगे यांना प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शिवदास मस्के यांनी आपले भावस्पर्शी मनोगत व्यक्त केले. “आज अशा कला जोपासना करणे सोपे राहिले नाही या कलांशी निगडित असणारे जे सोपस्कार आहेत ते माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला थोडेसे अवघडच वाटतात. एका बाजूला समाज दुसऱ्या बाजूला शिक्षण आणि कला जोपासताना लोककलावंताची मानसिक द्विधा मनस्थिती खूप वेदनादायक असते. या सर्व बाजूंचा तोल सांभाळताना लोककलावंत म्हणून मी हे सर्व सहन करीत आहेत. मात्र लोककला टिकावी पुढील पिढीकडे ती हस्तांतरित व्हावे हा हेतू मनात ठेवूनच मी हे काम करत आहे.” पुरस्कारार्थींच्या सन्मानपत्रांचे वाचन प्राध्यापिका दर्शना पाताडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र निवेदक राजेश कदम यांनी केले. ठाकर समाज बांधव विजय ठाकर यांनी ठाकर समाज आणि ठाकर लोककला याविषयीचा इतिहास मांडला.

यावेळी विचार मंचावरील प्राचार्य डॉक्टर गोविंद काजरेकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले,” वत्सला प्रतिष्ठानला मी सुरुवातीपासूनच सल्लागार संचालक म्हणून जोडलो गेलो आहे. त्यामुळे पुरस्कारार्थींची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये वर्षभर मी होतो. त्यामुळे या पुरस्कार निवडीमध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या कामी आम्ही यशस्वी झाला आहोत. समाजातील या कलांचे महत्त्व संशोधक या नात्याने मला चांगलेच माहित आहे. मौखिक साहित्य आज पुढच्या पिढीकडे देताना त्या पिढीची सक्षमता ती पुढे टिकवण्याची राहिली आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. नसेल तर अशी सक्षम पिढी आपल्याला अशा संस्थांच्या माध्यमातून पुन्हा उभी करावी लागेल. विविध प्रदेशात विखुरलेल्या लोककला आणि लोकभाषा शोधून काढून त्यांचा लेखी दस्ताऐवज निर्माण केला पाहिजे. कृषी संस्कृती मोडीत निघत त्याचबरोबर लोक साहित्यही संपुष्टात येत आहे. सामाजिक जाणकार म्हणून आपल्याला याची गंभीर जाण असणे आवश्यक आहे. नवे तंत्रज्ञान आल्यामुळे मुखाचे गुणगुणणे संपवून यांत्रिक आक्रस्ताळेपणा निर्माण झाला आहे. यामध्ये सर्व मानव समाजच गोंधळून गेला आहे. हे सगळे जीव घेणे आहे. अशा या काळामध्ये वत्सला प्रतिष्ठानचे काम खरोखरच प्रशसनीय आहे. जेव्हा जेव्हा प्रतिष्ठानला लोक साहित्याच्या संदर्भात माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी सदैव मदत करण्यास तयार आहे.”

२०२४-२५ चा वत्सला प्रतिष्ठानचा लोकसाहित्य संशोधन पुरस्कार प्राप्त गोव्यातील प्राध्यापक पौर्णिमा केरकर म्हणाल्या, “या प्रतिष्ठानचा संशोधनाचा पहिला पुरस्कार मला प्राप्त झाला याबद्दल मी वत्सला प्रतिष्ठानची ऋणी आहे. या पुरस्कारामुळे मला लोकसाहित्य संशोधनांमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. या क्षेत्रात काम करण्याची माझी जबाबदारी वाढली आणि या प्रेरणेपोटीच मी या प्रतिष्ठानला जोडून घेण्याचा प्रयत्न केला. एक छान, निर्भेळ, प्रामाणिक अशा प्रकारचे या प्रतिष्ठानचे कार्य आहे. मोहन कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी स्वच्छ भावनेने लोकसहित्य आपल्या सर्वापर्यंत पोहोचवण्याचे काम तळमळीने करत असतात त्यांच्या या कष्टाला खरोखरच मासे सलाम. आमच्यासारखी मंडळी खूप मेहनतीने जेव्हा लोकसाहित्य संशोधनाचे काम करत असतात तेव्हा या लोककलेची जोडलेल्या माणसांना त्यांच्या सानिध्यात राहून अनुभवता येते. खूप जुन्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रवास करून येता येते; ही वेगळी अनुभूती आहे. यामुळे मला एक वेगळे आत्मिक समाधान प्राप्त होते. या आंतरिक प्रेरणेमुळेच मी गोमंतकातील लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप हा ग्रंथ संपादित करू शकले. भविष्यात वत्सला प्रतिष्ठानला मनस्वी सहकार्य करणे हे माझे आद्य कर्तव्य राहील. आम्ही संशोधन करतो म्हणजे आम्हाला कुठला पुरस्कार मिळावा,कोणी आपली वाहवा करावी ही अपेक्षा नसते, तर निर्मळ मनाने समाजातील कलात्मकता टिकवणे हाच एक ध्यास असतो.”

गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर म्हणाले, ” सिंधुदुर्गमध्ये अनेक लोककला ग्रामीण भागामध्ये नांदत आहेत. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प होत चाललेले आहे. माणसे नोकरी निमित्त शहराकडे मुंबईसारख्या ठिकाणी वळत आहेत. गावे ओस पडत चाललेली आहेत. परिणामी लोकसाहित्यावर त्याचा दूरगामी परिणाम झाला आहे. “लोक साहित्य संवर्धन आणि संशोधन पुरस्कार निवड समितीमध्ये काम करताना महाराष्ट्र स्तरावर काम करणाऱ्या अनेक लोकसाहित्य संशोधकांची नाव आमच्या समोर आली होती. कोणतेही अर्ज न मागवता जरी हे पुरस्कार आम्ही देत असलो तरी सद्यस्थितीत ज्या ठिकाणी वत्सला प्रतिष्ठान कार्यरत आहे त्या अवतीभवतीच्या लोकसाहित्य कलावंत आणि संशोधकांना अग्रक्रमाने व्यासपीठावर आणणे आम्हाला महत्त्वाचे वाटले, म्हणूनच या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठाकर लोककला जिवंत असून त्यांना न्याय देणे आम्हाला क्रमप्राप्त वाटले, म्हणूनच आम्ही ठाकर लोककला संशोधक आणि कलावंत यांचा प्रकर्षाने निवड केली” असे प्रतिष्ठानचे सल्लागार वीरधवल परब म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकस मराठी कविता लेखन करणाऱ्या सिद्धार्थ गोपाळ तांबे, सरिता पवार, कल्पना मलये व सुचिता गायकवाड कदम यांचा विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन साहित्य सन्मानाने गौरव करण्यात आला. भविष्यामध्ये असे साहित्य पुरस्कार देऊन साहित्य निर्मितीला प्रेरित करण्याचा विचार पुढे आला.

या समारंभ प्रसंगी वैद्यकीय, साहित्य, समाज व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कणकवली शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर बिरमोळे, डॉक्टर शमिता बिरमोळे, डॉक्टर अशोक कदम, सतीश पवार, डॉक्टर कोदे, त्याचबरोबर प्रसाद घाणेकर, आचरेकर प्रतिष्ठानचे प्रसिद्ध नाट्यकर्मी वामन पंडित, लोककलावंत प्राध्यापक हरिभाऊ भिसे, व्ही. के. सावंत, राजेश कदम,शलाका मेस्त्री, कणकवली लायन्स क्लबचे बुचडे व महेश काणेकर, गोपुरी आश्रम चे संदीप सावंत, तनिष्का संदीप सावंत, विनायक सापळे, सुप्रसिद्ध कवी अरुण नाईक, मनीषा पाटील, गोव्याचे प्रसिद्ध पर्यावरणवादी प्राध्यापक राजेंद्र केरकर, लेखिका समृद्धी केरकर, सामाजिक कार्यकर्ते विलास गुडेकर, कवी किशोर कदम, पत्रकार निकेत पावसकर, पत्रकार राजन चव्हाण, लोककलावंत मालती मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पुरस्कारार्थी शिवदास मसगे यांच्या चित्रकथी सादरीकरणाने झाली.

error: Content is protected !!