बळीराजा शेत, पाणंद रस्ता योजनेच्या कणकवली विधानसभा क्षेत्रस्तर अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री

पालकमंत्री नितेश राणे यांची शिफारस ; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नीतेश राणे यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या कणकवली विधानसभा क्षेत्रच्या अध्यक्षपदी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री – बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी व क्षेत्रीय स्तरावरील कामकाजात लोकप्रतिनिधींचा सहभाग व प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार कणकवली विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी तुप्ती धोडमिसे यांनी ही नियुक्ती केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बारमाही रस्ते असणे आवश्यक आहे. या हेतूने शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू केली. विधानसभा क्षेत्र स्तरावर त्या – त्या विधानसभेचे आमदार हे या विधानसभा मतदार संघ क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मंत्री असतील तर ते ठरवतील ते लोकप्रतिनिधी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे अध्यक्ष असणार आहे. त्यानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघचे आमदार नीतेश राणे हे मंत्री व पालकमंत्री असल्याने त्यांच्या शिफारशीनुसार श्री. मेस्त्री यांची या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीचे सदस्य सचिव म्हणून उपविभागीय अधिकारी असणार आहेत. तसेच या समितीत सदस्य म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली देवगड व वैभववाडी तालुक्यांचे तहसीलदार, तीनही तालुक्याचे गटविकास अधिकारी, तसेच कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्याचे भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक, तीनही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, विधानसभा क्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, तीनही तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, तीनही तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता व तीनही तालुक्यांच्या पंचायत समितीचे लेखा अधिकारी हे सदस्य असणार आहेत. तसेच या समितीत प्रगतिशील शेतकरी म्हणून सावडाव येथील सिद्धी उत्तम वारंग, चिंचवली येथील अनिल मनोहर पेडणेकर देवगड तालुक्यातील वाघोटन येथील जनार्दन तेली, देवगड येथील विद्याधर जोशी व वैभववाडी येथील महेश संसारे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!