वैभववाडीत मोफत आरोग्य शिबीराचा रूग्णांनी घेतला लाभ

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई व ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रशालेत शिकणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक व नातेवाईक तसेच वैभववाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे योग्य मार्गदर्शन व उपचार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली व्हावे या हेतूने वैभववाडी येथे आज शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी अर्जुन रावराणे विद्यालयात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात कोल्हापूर येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांचे स्वागत करण्यात आले. रुग्णांना मोफत तपासणी अंती रुग्णांना उपचारासंबंधी मार्गदर्शन केले तसेच गंभीर आजारावर शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

या आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, डायबेटीस, थायरॉईडचे आजार, पोट विकार, किडनी विकार, मेंदू विकार, छातीचे आजार, हृदयरोग, स्तनातील गाठ, गर्भाशयाचे आजार, अनियमित रक्तस्त्राव, कर्करोग, व्हेरिकोज व्हेन्स, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, गर्भाशयातील फायब्रॉइड, रक्तवाहिन्यांचे आजार, लहान मुलांचे आजार, ब्लड शुगर अशा सर्व समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन शिबिरावेळी करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीधर पाटील आयसीयू इन्चार्ज ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर डॉ. शिवाजीराव लाड डॉ. राहुल कदम डीएनबी मेडिसिन डॉ. महेश पटवर्धन, ॲपल सरस्वती हॉस्पिटल कोल्हापूर चे डॉ. शहा, वैभववाडी पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, जि. प. सदस्य श्रावणी रोहन रावराणे, नगरपंचायत वाभवे – वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, वैभववाडी आरोग्य अधिक्षक डॉ. चव्हाण तसेच विविध भागातील शिबिरास आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!