चौके हायस्कूलमध्ये “खेळ मातीतील” शिबिर संपन्न

चौके (प्रतिनिधी) : सध्याच्या जगात आधुनिकतेच्या नावाखाली बालपण हरवत चाललेल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवत जुन्या पारंपारिक मातीतल्या खेळांची ओळख करून देणारे दोन दिवसीय शिबिर मालवण तालुक्यातील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके प्रशाले मध्ये पार पडले. या शिबिरामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांसोबतच पंचक्रोशीतील अनेक शाळांचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळी साडेसात वाजता योगा – प्राणायाम करून दिवसाची सुरुवात होत असे. यानंतर विविध कवायत प्रकारांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली गेली. विद्यार्थ्यांनी विटी दांडू, दोरी उड्या, गोणपाट उड्या, लंगडी, धावणे, तीर गाडी,चमचा गोटी, आईचा रुमाल हरवला, कांदा फोड, लगोरी, संगीत खुर्ची इत्यादी जुन्या खेळांचा मनमुराद आनंद लुटला. शंकर गावडे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगा प्रात्यक्षिके करून दाखवून त्यांचे महत्त्व सांगितले. विजय चौकेकर सर यांनी विटी दांडू खेळाचे सर्व नियम प्रात्यक्षिका सहित विद्यार्थ्यांना करून दाखविले व खेळाचा आनंदही लुटला. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत दोन दिवस या पारंपारिक खेळांचा आनंद घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. शिबिराच्या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांना तांदळाची पेज, वालीची भाजी व चवळीची उसळ देण्यात आली. समारोपाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक समिति अध्यक्ष बिजेंद्र गावडे, स्थानिक समिती सल्लागार मंगेश चव्हाण, शंकर गावडे सर, विजय चौकेकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!