तळेरे (प्रतिनिधी) : शेजवली येथील श्री निनादेवी मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्त सकाळी देवीचा अभिषेक आणि सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. सकाळी ९ वाजल्यापासून वाल्ये, पन्हाळे, जुवाठी, वायंगणी, कोर्ले, बांदिवडे, उपळे आणि गुंजवणे या परिसरातील विविध देवी-देवतांच्या पालख्यांचे आगमन होईल. सायंकाळी सामूहिक ढोल वादन आणि पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री भजन सम्राट श्रीधर मुणगेकर (बुवा) आणि मनोहर पुंडलिक कदम यांचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी रात्री १०:३० वाजता ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे महाराष्ट्रातील गाजलेले तुफान विनोदी लोकनाट्य सादर होणार आहे. या त्रैलोक्य सुंदर सोहळ्याचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळी, शेजवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शेजवलीत श्री निनादेवी मंदिरात रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन












