सोमवार पर्यंत फोंडाघाट नदीतून जड वाहतूक बंद न झाल्यास, स्वतः लक्ष घालणार.– जि. प. सदस्य राजन चिके यांचा प्रशासनाला इशारा !

प्रशासन पादचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, दुचाकीस्वार चिरडण्याची वाट पाहत आहे का ?

ठेकेदार व तथाकथित स्थानिक नेते यांचा स्वार्थी हेतू स्पष्ट !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या ग्रामपंचायत जवळील उगवाई नदीवरील आणि सापळे हातोड्याचा व्हाळ, यावरील ब्रिटिशकालीन ब्रिज, रुंदीकरण व पुनर्बांधणीसाठी पाडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तारीख ७/१/२०२६ रोजी आदेशाद्वारे जड वाहतुकीसाठी नदीमधून बांधलेल्या तात्पुरत्या रस्त्यावरून एस. टी. वगळता बंद केली होती. व ती वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र आज अखेर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून, सर्व जड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत आहे. याकडे पीडब्ल्यूडी, ठेकेदार, वाहतूक नियंत्रक पोलीस पथके, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासनाच्या व ठेकेदारांच्या या हलगर्जीपणा व बेपरवाईमुळे, नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या चढावावर, पादचारी-विद्यार्थी- लहान वाहने, वरून येणाऱ्या भरधाव वाहनाखाली चिरडण्याची शक्यता नव्हे प्रसंग निर्माण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य राजन चिके यांनी कणकवली पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या गंभीर विषयाची पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासनाने, समक्ष घडणाऱ्या प्रसंगाची दखल घेऊन प्रशासन व वाहतूक प्रतिनिधी व नवनियुक्त लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक घेऊन, वाहतूक बंद करणे बाबत ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांनी कोल्हापूर वरून कोकणात येणाऱ्या गाड्या तसेच चेक पोस्ट वरून गाड्या सोडल्या जातात.अशी तक्रार केली. सध्या पर्यटनाचा सीजन, गाड्यांची वर्दळ, शिवाय ठेकेदाराच्या कामाचा कर्णकर्कश्य आवाज, धुळीचे साम्राज्य यामुळे लगतचे रहिवासी ,दुकानदार, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जड वाहतूक सोमवार पर्यंत बंद झाल्यास स्वतः लक्ष घालणार असल्याचे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या बाबी, शांतता, सुव्यवस्था चे प्रशासन व संबंधित जबाबदार राहतील असा इशारा जि. प. सदस्य राजन चीके यांनी दिला आहे.

error: Content is protected !!