वेंगुर्ला मारहाण प्रकरणात दोन आरोपींचा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ला पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी दर्शन दयानंद गडेकर, भूषण दयानंद गडेकर ( दोन्ही. रा.शिरोडा, ता. वेंगुर्ले ) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. रुपेश देसाई यांनी जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शवत जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी यशस्वी युक्तिवाद केला. या प्रकरणात आरोपी भूषण आणि दर्शन यांनी फिर्यादी समीर हरिश्चंद्र परब व साक्षीदार बबलू उर्फ श्रीनाथ विजय परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित गुन्हा भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली नोंदवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी कोणतेही कारण नसताना फिर्यादी व साक्षीदारांवर लाकडी दांडक्याने हल्ला करत गंभीर दुखापत केली. या घटनेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून वापरलेले हत्यार जप्त केले असून, पंचनामा व साक्षीदारांच्या जबाबांमधून आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, जखमी साक्षीदारांचे वैद्यकीय अहवाल व जबाबही आरोपींविरुद्ध मजबूत पुरावा ठरत आहेत.पोलिसांनी न्यायालयात मांडलेल्या अहवालात म्हटले आहे की, आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकण्याची, धमकावण्याची तसेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. आरोपी व फिर्यादी हे एकाच परिसरात राहत असल्याने भविष्यात पुन्हा गंभीर प्रकार घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय, आरोपींचा स्वभाव आक्रमक असून ते पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी फरार होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रुपेश देसाई यांच्याकडून करण्यात आला.सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी दोन्ही आरोपींचा जामीन नामंजूर केला.

error: Content is protected !!