डॉक्टरवर हल्ला व रुग्णालयातील तोडफोडीचा तीव्र निषेध; कडक कारवाईची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण करून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचा डॉक्टर्स फ्रटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

दि. २६ एप्रिल रोजी एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबावर मोठा आघात झाला असून, त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे डॉक्टर संघटनेने नमूद केले आहे. तथापि, बालकाचा मृत्यू उपचारापूर्वीच झाल्याचे घोषित केल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेचा डॉक्टर संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

डॉक्टर हे समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होणे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अशा घटनांमुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत : संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, रुग्णालयातील तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित कायदे प्रभावीपणे राबवावेत. अशी मागणी डॉक्टर्स फ्रटर्निटी क्लब, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, तालुकाध्यक्ष डॉ. संजय मराठे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण मिस्त्री, सचिव अमित गोखले व खजिनदार डॉ. उपेंद्र हिर्लेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!