सर्वसामान्यांच्या हृदयातील तहसिलदार आर. जे. पवार

तहसिलदार आर. जे. पवारांवर विशेष लेख

कणकवली (प्रतिनिधी) : शासन सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शांत स्वभाव आणि जनसामान्यांविषयी असलेली आत्मीयता या गुणांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे तहसिलदार आर. जे. पवार हे आज ३१ मे २०२६ रोजी प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. नंदुरबारमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत तलाठी ते तहसिलदार या पदांवर उत्कृष्टरित्या काम करताना सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून ठेवण्याची कार्यपद्धती अर्थात भाऊ ते रावसाहेब हा त्यांचा प्रवास अनुकरणीय असाच आहे. आपल्या सेवा कालावधीत त्यांनी नियमाची चौकड न मोडता सर्वसामान्यांना न्याय देतानाच कोरोना कालावधीतही दाखविलेली माणूसकीही त्यांच्या कार्यकर्तुत्वाची प्रचिती देते. अशा या सर्वसामान्यांतील अधिकाऱ्याची आजची सेवानिवृत्ती अर्थात नविन जिवनाची सुरूवात त्यांना आनंदी, यशस्वी व दिर्घायुष्य देणारी ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

दिनांक १२ जानेवारी १९९० रोजी शासन सेवेत तलाठी म्हणून रमेश जेठ्या पवार यांनी देवगड तालुक्यातील हडपीड येथून प्रवेश केला आणि तब्बल ३६ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी महसूल प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे पार पाडल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा मानून काम केले. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी सदैव तत्परता दाखवली.
आर. जे. पवार या नावाने ओळख निर्माण करणाऱ्या श्री. पवार साहेब यांनी देवगड तालुक्यात मुणगे, हिंदळे, मिठबांव आदी भागात सन २००१ पर्यंत तलाठी म्हणून काम केले. त्यानंतर सन २००१ मध्ये कणकवली तालुक्यातील कलमठ येथे तलाठी म्हणून बदली झाली. त्यांनी सन २००७ पर्यंत कलमठ येथे काम केल्यानंतर काही काळ हुंबरठ येथे तलाठी म्हणून काम केले व त्यानंतर त्यांना बढती मिळत ते वैभवावडी येथे मंडळ अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर सन २००८ मध्ये ते कणकवली येथे मंडळ अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांची कसाल येथे मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली व कसाल येथे कार्यरत असतानाच त्यांना नायब तहसिलदार म्हणून बढती मिळत ते कणकवली येथे निवासी नायब तहसिलदार म्हणून रुजू झाले. सन २०१६ मध्ये नायब तहसिलदारपदी कार्यरत असताना त्यांची उपविभागिय कार्यालय श्रीवर्धन येथे नायब तहसिलदार म्हणून बदली झाली. तर सन २०१९ मध्ये ते कणकवली येथे निवासी नायब तहसिलदार म्हणून रुजू झाले.

दरम्यानच्या कालावधीत त्यांना बढती मिळत ते कणकवली येथे तहसिलदार म्हणून कार्यरत झाले. त्यानंतर त्यांनी देवगड तहसिलदार, संजय गांधी योजना तहसिलदार अंधेरी-मुंबई तसेच पुन्हा देवगड येथे तहसिलदार म्हणून काम केले. आज देवगड येथे तहसिलदार म्हणून कार्यरत असतानाच ते ३६ वर्षे ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात असो, पूर परिस्थिती असो किंवा कोरोना महामारीसारखा कठीण काळ असो, पवार साहेबांनी अत्यंत धैर्याने आणि जबाबदारीने प्रशासनाची धुरा सांभाळली. कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. कणकवली येथे कोरोना कालावधीत अनेकदा गरजूंना अत्यावश्यक सेवा, जेवण उपलब्ध करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक संस्था, सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून गरीब, गरजूंना अन्नदान केले.

कोरोनासारख्या महामारीची कोणतीही तमा न बळगता २४ तास कार्यरत राहत त्यांनी संकटकाळात अधिकारी कसा असावा याचा उत्तम वस्तुपाठच घालून दिला. कोरोना कालावधीत आर. जे. पवार यांनी केलेले काम आजही उल्लेखनिय ठरते हे विसरून चालणार नाही. महसूल विभागातील आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत सातबारा संगणकीकरण, ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता आणि गती निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान झाले. एकीकडे प्रशासकीय कामाकाजात गतीमानता, पारदर्शकता आणून काम करत असतानाच तहसिलदार कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीही त्यांचा सातत्याने प्रयत्न असायचा. कणकवली तहसिलदार कार्यालयात लोकसहभागातून फर्निचरसहीत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

आर. जे. पवार साहेबांचा शांत, संयमी आणि समन्वयवादी स्वभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण राहिला आहे. सेवाकाळात त्यांनी कधीही कोणाशी कटुता ठेवली नाही. अधिकारी, कर्मचारी, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांनी नेहमी सुसंवाद ठेवला. विशेष म्हणजे कोणत्याही वेळी कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी किंवा पक्षकार यांचा फोन तत्परतेने उचलून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि मार्गदर्शन करणे ही त्यांची उल्लेखनीय कार्यपद्धती होती. त्यामुळे सर्व स्तरांत त्यांच्याविषयी विशेष आदर आणि आत्मीयता निर्माण झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतेमंडळींसोबत त्यांचे अत्यंत स्नेहपूर्ण आणि विश्वासाचे संबंध राहिले. विशेषतः खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचा त्यांच्यावर विशेष विश्वास आणि स्नेह राहिला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून विकासकामांना गती देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असलेल्या पवार साहेबांनी आपल्या कर्तृत्वाने आणि प्रामाणिक सेवेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमिताने त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांनी दिलेले मार्गदर्शन, प्रशासनातील त्यांची कार्यशैली आणि माणुसकी जपणारा स्वभाव कायम स्मरणात राहील!

कणकवली तहसिलदार कार्यालय येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने ७५ फुटांचा ध्वजस्तंभ उभा करण्याचे शिवधनुष्य आर. जे. पवार यांनी उचलले. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत हे शिवधनुष्य त्यांनी पेलले. तहसिलदार कार्यालय परिसराचे सुशोभिकरण करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

संभाजी नामदेव खाडे सहाय्यक महसूल अधिकारी, कणकवली

error: Content is protected !!