लोकप्रतिनिधींना अपमानास वागणूक सरपंच संघटना आक्रमक

बांदा (प्रतिनिधी) : मर्डर करून या!” असे धक्कादायक आणि बेजबाबदार वक्तव्य बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज झाजूर्णे यांनी केल्याचा आरोप करत, सिंधुदुर्ग सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बांदा पोलीस ठाण्यावर आज सकाळी जोरदार धडक दिली. “कायदा व सुव्यवस्था राखणारे अधिकारीच जर गुन्‍ह्याला प्रवृत्त करणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे?” असा संतप्त सवाल करत पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. अखेर संबंधित उपनिरीक्षकाने मोबाईलद्वारे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आणि प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

​ कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यासाठी एका तक्रार करण्यासाठी बांदा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी कर्तव्यावर असलेले उपनिरीक्षक शिवराज झाजूर्णे यांनी तक्रारदाराला सहकार्य करण्याऐवजी, “मर्डर करून या” असा अजब आणि धक्कादायक सल्ला दिला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. ​ या घटनेच्या पार्श्वभूमीवर इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नीतीन राऊळ, सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले. प्रवीण गवस, गुणाजी गावडे, संदीप नेमळेकर आणि सरपंच संघटनेचे नेते हेमंत मराठे यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींनी बांदा पोलीस स्टेशनवर सकाळी धडक दिली.

​”पोलीस अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीला ‘मर्डर करा’ असे बोलणे अत्यंत निषेधार्ह आहे. जर तुम्हीच गुन्हा करायला सांगणार असाल, तर गुन्हे कमी कसे होणार? तुम्ही लोकसेवक आहात आणि आम्ही जनसेवक. आम्हाला सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे.” असा आक्रमक पवित्रा संघटनेच्या पदाधिकारी यांनी घेतला.​ आंदोलकांनी बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज शिंदे यांना जाब विचारला असता, संबंधित अधिकारी शिवराज झाजूर्णे हे ओरस येथे प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. ते गेले पंधरा दिवस प्रशिक्षणसाठी आहेत. यावर आंदोलक अधिकच संतप्त झाले. “जर ते ट्रेनिंगला गेले होते, तर काल त्यांनी अशा प्रकारे हस्तक्षेप करण्याची गरज काय होती?” असा सवाल संदीप नेमळेकर यांनी उपस्थित केला. जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित अधिकारी स्वतः येत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला.
असा प्रकार जर सरपंच यांना मिळत असेल तर ​”सामान्य माणसाने काय करावे? याबाबत काल पासून तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली ते आधी सांगा, पाठीशी घालू नका,” अशी मागणी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी लावून धरली. तसेच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

​ परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून प्रभारी अधिकारी पंकज शिंदे यांनी आंदोलक लोकप्रतिनिधींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “असा प्रकार पुन्हा घडणार नाही. या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर करत आहोत,” योग्य ती कारवाई होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ​त्यानंतर, प्रभारी अधिकाऱ्यांनी ओरस येथे असलेल्या उपनिरीक्षक शिवराज झाजूर्णे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून दिला. यावेळी झाजूर्णे यांनी “माझ्याकडून अनावधानाने ‘मर्डर’ हा शब्द वापरला गेला” असे सांगत दिलगिरी व्यक्त केली. उपनिरीक्षकाच्या दिलगिरीनंतर सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कार्यालय सोडले.

यावेळी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस, कास सरपंच प्रवीण पंडित, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, साळेल सरपंच रवींद्र साळकर, कळणे सरपंच अजित देसाई, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, तळगाव सरपंच लता खोत, मोरगाव सरपंच संतोष आईर, किनळे सरपंच दीपक नाईक, तळवणे सरपंच गोविंद केरकर, हेमंत मराठे, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, झरेगाव सरपंच श्रुती देसाई आदी उपस्थित होते

error: Content is protected !!