सदोष यंत्रणेविरोधात शेतकरी उतरणार मैदानात!
बापर्डे सरपंच संजय लाड यांची आक्रमक भूमिका
देवगड (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या तापमानामुळे होरपळून निघाला आहे. त्यातच पीक विमा कंपनीने बापर्डे आणि पडेल सर्कलच्या शेतकऱ्यांवर अत्यंत अन्यायकारक धोरण अवलंबले आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या वर गेला असतानाही, केवळ विमा कंपनीच्या ‘सदोष’ निकषांमुळे शेतकऱ्यांना विमा संरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. विमा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उद्या दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 11वाजता बापर्डे येथे तातडीची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे.
या लढ्याचे नेतृत्व स्वतः शेतकरीच करेल!
या आंदोलनाची भूमिका मांडताना बापर्डे गावचे सरपंच संजय लाड यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. सरपंच संजय लाड म्हणाले की, “हा लढा कोणा एका व्यक्तीचा, पक्षाचा किंवा नेत्याचा नाही. विमा कंपनीने या भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पोटावर पाय दिला आहे. त्यामुळे बापर्डे आणि पडेल सर्कल मधील प्रत्येक पीडित शेतकरी स्वतः या लढ्याचे नेतृत्व करेल. शेतकरी आता स्वतः आपल्या हक्कासाठी पुढारी होऊन या अन्यायाविरोधात मैदानात उतरणार आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
विमा कंपनीच्या सदोष यंत्रणेचा भुदंड शेतकऱ्यांना का?
सरपंच संजय लाड यांनी विमा कंपनीच्या कारभारावर कडाडून टीका केली. “एप्रिल महिन्यात उष्णतेचा उच्चांक गाठलेला असतानाही केवळ तांत्रिक कारणे दाखवून विमा नाकारला जात आहे. विमा कंपनीने बसवलेली ट्रिगर तपासणी यंत्रणाच बापर्डे आणि पडेल सर्कलमध्ये पूर्णपणे सदोष आहे. कंपनीने या यंत्रणेची वेळेवर देखभाल (Maintenance) केली नाही, आणि त्यांच्या याच चुकीचा व निष्काळजीपणाचा भुदंड आज या परिसरातील प्रामाणिक शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून विम्याचे पैसे भरले असूनही, संकटसमयी जर हे संरक्षण मिळणार नसेल, तर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय?” असा संतप्त सवाल लाड यांनी केला.
भौगोलिकदृष्ट्या एकमेकांना लागून असलेल्या पाटगाव सर्कलला ज्या निकषावर विमा मंजूर झाला, तोच निकष बापर्डे-पडेल सर्कलला का नाकारला? विमा कंपनीची ही यंत्रणा जमिनीवरील वास्तवाचा अभ्यास न करता केवळ कागदी घोडे नाचवणारी ठरत आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.
1जून रोजी ग्रामसभेतून उग्र आंदोलनाचा एल्गार!
केवळ कागदी पत्रव्यवहार करून हा प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव असल्याने आजच्या विशेष ग्रामसभेत संपूर्ण परिसरातील शेतकरी एकत्र येऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत.
सरपंच संजय लाड यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, “जर आमच्या या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने विमा मंजूर केला गेला नाही, तर बापर्डे आणि पडेल सर्कल मधील प्रत्येक गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी रस्त्यावर उतरून ‘उग्र आंदोलन’ छेडतील. प्रत्येक शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या लोकआंदोलनामुळे तालुक्यात व जिल्ह्यात जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला विमा कंपनी आणि संबंधित प्रशासनच पूर्णपणे जबाबदार असेल.” या भूमिकेमुळे आता हा लढा तीव्र होणार असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.












