“वरवडेच्या मातीतून गुजरातच्या उद्योगविश्वापर्यंत… अचित कदम यांचा प्रेरणादायी प्रवास”

युवा उद्योजक अचित कदम वाढदिवस विशेष

यश हे कधीही एका दिवसात मिळत नाही. त्यामागे असते जिद्द, मेहनत, धाडस आणि आपल्या स्वप्नांवर असलेला अढळ विश्वास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे-हिवाळेवाडी या छोट्याशा गावातून निघालेला अचित सूर्यकांत कदम या युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्याचा प्रवास ही अशाच संघर्ष, चिकाटी आणि यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. आपल्या राजकीय जीवनात खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे या राणे फॅमिलीला आपला आयडॉल मानणारे अचित कदम कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता एकनिष्ठेने पक्ष संघटनेचे काम करत आहेत.
गावातील साध्या वातावरणात वाढलेल्या अचित कदम यांनी आपले पूर्व प्राथमिक शिक्षण वरवडे-हिवाळेवाडी जिल्हा परिषद शाळेत घेतले. त्यानंतर वरवडे मुस्लिमवाडी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि कणकवली येथील एस. एम. हायस्कूलमधून एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात पुस्तकांपेक्षा खेळाचे मैदान आणि व्यवसायाच्या संकल्पना यांच्याकडे त्यांचा अधिक कल होता. अनेकांना ही गोष्ट वेगळी वाटली असेल, परंतु पुढे हाच दृष्टिकोन त्यांच्या यशाचा पाया ठरणार होता. दहावीतून शाळा सोडल्यानंतर अचित यांनी कौटुंबिक प्रतिकूल आर्थिक स्थितीमुळे प्रसंगी मोलमजुरी केली.
तरुण वयातच मोठी स्वप्ने घेऊन त्यांनी मुंबईची वाट धरली. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोकेमिकल मध्ये वेल्डरची नोकरी केली. 2003 ते 2005 कलाकार कॅडबरी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर, 2005 ते 2016 दरम्यान पीव्हीएन फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या मुलुंड मधील कंपनीत मॅनेजर पदी काम केले. मेहनत, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मॅनेजर पदापर्यंत मजल मारली. या काळात त्यांनी केवळ नोकरी केली नाही, तर बाजारपेठ, ग्राहक मानसशास्त्र, विक्री कौशल्य आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून शिकले.
नोकरीत मिळालेल्या अनुभवाच्या भक्कम आधारावर त्यांनी स्वतःचा ट्रेडिंग व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनेकांना सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायात उतरणे धोक्याचे वाटते, परंतु अचित कदम यांनी जोखीम पत्करली आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला.
पीपी, एचडीपीई, बीओपीपी वोवेन सॅक बॅग्ज चा पुरवठा फर्टिलायझर कंपनी, शुगर कंपनी, फूड ग्रेन कंपनी आणि राईस कंपन्यांना करत असे.2016 ते 2019 दरम्यान अचित यांनी रिद्धी फ्लॅक्स इंडस्ट्री मध्ये पार्टनरशीपमध्ये हेच सेम प्रोडक्शन केले.
सन 2020 मध्ये त्यांनी गुजरातमधील सुरत येथे “ए के पॅकेजिंग” ही स्वमालकीची फॅक्टरी भागीदारी तत्त्वावर सुरू केली.आज त्यांच्या व्यवसायातून शुगर, फर्टिलायझर, राईस आणि विविध फूड इंडस्ट्रींना मोठ्या प्रमाणात बॅग्जचा पुरवठा केला जातो.
एका छोट्याशा गावातील तरुणाने देशातील महत्त्वाच्या औद्योगिक शहरात स्वतःचा उद्योग उभारणे ही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी लागते दूरदृष्टी, मेहनतीची तयारी आणि अपयशालाही सामोरे जाण्याची हिंमत. अचित कदम यांनी हे सर्व गुण आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.
व्यवसायात यश मिळवूनही त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. वरवडे गावाशी असलेले त्यांचे प्रेम आणि बांधिलकी आजही तितकीच घट्ट आहे. “अचित कदम मित्रमंडळ” आणि “स्वाभिमान प्रतिष्ठान, वरवडे” यांच्या माध्यमातून ते विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवत असतात. समाजासाठी काहीतरी परत देण्याची भावना हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
व्यवसायासोबतच त्यांचे आणखी एक मोठे प्रेम म्हणजे क्रिकेट. टेनिस क्रिकेटचे वेड असलेले अचित कदम यांनी या क्षेत्रातही वेगळी छाप निर्माण केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड यांसारख्या जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्येही त्यांचा संघ राज्यस्तरीय आणि आंतरराज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. “ए के स्पोर्ट्स” हा संघ आज तळकोकणातील क्रिकेटविश्वात एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून ओळखला जातो. अनेक युवा खेळाडूंना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अचित कदम यांची कथा ही केवळ एका उद्योजकाची यशोगाथा नाही. ती स्वप्नांना कृतीची जोड दिल्यास कोणतीही उंची गाठता येते याचा जिवंत पुरावा आहे. गावातील एका साध्या विद्यार्थ्यापासून गुजरातमध्ये यशस्वी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकापर्यंतचा त्यांचा प्रवास आजच्या युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरत आहे. माणसाचे मोठेपण हे केवळ स्वतः मोठे होण्यात नाहीय तर आपल्यासोबत इतरांना मदतीचा हात देऊन त्यांनाही आर्थिक सक्षम बनण्यात सहकार्य करण्यात मोठेपण असते. आज होतकरू युवक अचित कदम यांची प्रेरणा घेऊन स्वकर्तृत्व सिद्ध करत आहेत. उद्योगातून आर्थिक सधनता आल्यावर निर्हेतू सामाजिक जाणिव ठेवणारे हाताच्या बोटावर असतात. अचित कदम हे नि:स्वार्थीपणे समाजातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम , वस्ती शाळांमध्ये आर्थिक तसेच वस्तूरुप मदत करत असतात. इतिहास नेहमी मोठ्या शहरांमध्ये जन्म घेत नाही; कधी कधी तो वरवडे-हिवाळेवाडीसारख्या छोट्या गावातून सुरू होतो आणि गुजरातच्या उद्योगविश्वात अचित कदम यांच्या रुपात आपली सुवर्णाक्षरांनी नोंद करून जातो. युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अचित कदम यांना निरोगी दीर्घायुरारोग्य लाभो, त्यांच्या उद्योगात नेहमी यश लाभो हीच जन्मदिनी आपला सिंधुदुर्ग न्यूज परिवाराच्या वतीने सदिच्छा !

error: Content is protected !!