शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, पेरणीची घाई न करण्याचा सल्ला
मुंबई (प्रतिनिधी) : मान्सूनने दक्षिण कोकणात प्रवेश केल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये १ जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदर जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ते अतितुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्र व्यापणारा नसून प्रामुख्याने पूर्वमोसमी स्वरूपाचा राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ व खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, असे सांगितले आहे. तसेच विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच वीज ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांजवळ थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












