कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा – कला शिक्षक गणेश अपराज….!

चिंदर गावातील दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

सरस्वती वाचनालय चिंदर व सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर आयोजित व सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई पुरस्कृत चिंदर गावातील इयत्ता दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार ६ जून रोजी शाळा चिंदर नं १ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, विद्येची देवता श्री देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. इयत्ता दहावी मधून चिंदर गावातून प्रथम आलेल्या उर्वशी चंद्रसेन पारकर, व्दितीय ॲरोन संतान्तो फर्नांडिस व धनश्री गिरीश भावे तसेच बारावी मधून प्रथम राजश्री धनाजी बारंगळे, व्दितीय रिद्धी संतोष अपराज तृतीय गौरव रणजित दत्तदास, सी.बी. एस.ई मधून दहावी मधील दुर्गा श्रीपाद म्हापसेकर याच्या सह गावातील ४३ विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी वाचनालय उपाध्यक्ष संतोष पाताडे, मोरेश्वर गोसावी, गोपाळ चिंदरकर, संतोष अपराज, गजानन पाटणकर, सागर अपराज, सतांन्तो फर्नांडिस, अजित लब्दे, विनायक मसुरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, प्रतिक्षा पालकर-माडये, चिन्मयी पाताडे, हर्षद बेनाडे, जान्हवी घाडी, संजय भावे, रणजित दत्तदास आदी उपस्थित होते. कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा – कला शिक्षक गणेश अपराज स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा ताळमेळ साधून आपल्या भविष्यातील क्षेत्राची निवड करा म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी अडचण येणार नाही. फक्त इतरांचे अनुकरण न करता, स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि मूल्ये ओळखून निर्णय घेतल्यास करिअरमध्ये आनंद आणि यश दोन्ही मिळतात. कला क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या पेंटर पासून मोठ्या आर्टीस्ट पर्यंत खूप संधी उपलब्ध असून आपण अशा क्षेत्राकडे वळल्यास आपली नेहमीची सहकार्याची भूमिका राहिल. आपण आजवर कला क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडवले असून विद्यार्थ्यांनी आपल्या बाह्य जगात स्वतः ला सिध्द केलेल पाहून मिळालेला आनंद अद्वितीय असतो. माझ्या गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास मिळणे हि आपली सौभाग्याची गोष्ट असून कला क्षेत्रात चिंदर गावातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व मुंबईस्थित कला शिक्षक गणेश अपराज यांनी केले. *स्वता:ची वेगळी ओळख निर्माण करा – हवालदार संतोष सावंत* बहुतांशी कोकणातील विद्यार्थी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मुंबईची वाट धरतात स्पर्धा परीक्षेकडे कुणी वळत नाही. सैन्य दलात विविध संधी उपलब्ध असतात यासाठी मेहनत आणि जिद्द, चिकाटी आवश्यक आहे. बारावी नंतर विज्ञान शाखा घेऊन आपण सैन्य दलाकडे वळू शकता. तसेच शासनाने अग्नीवीर हि पण चांगली संकल्पना राबविली असून त्या द्वारे आपण थेट सैन्य दलात भरती होऊ शकता. आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा असे मार्गदर्शन हवालदार मराठा रेजिमेंट आर्मी तसेच चिंदर आरोग्य उपकेंद्र आरोग्य सेवक संतोष सावंत यांनी केले. शिक्षण प्रेमी कै वसंत मेस्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा – प्रकाश मेस्त्री कै. वसंत मेस्त्री यांनी चिंदर गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकूनच मुंबई येथे जाऊन सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखी अग्रणी शिक्षण संस्था स्थापन केली ज्यांनी हजारों विद्यार्थी घडवले जे देश विदेशात नाव कमावत आहेत. अशा प्रकारे आपण पुढील शैक्षणिक वाटचाल करा. कै. वसंत मेस्त्री सारख्या शिक्षणप्रेमींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सहकार्यासाठी श्री देवी सरस्वती वाचनालय, चिंदर सेवा संघ, सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, गणेश अपराज यांची तुर्या गृप ऑफ आर्ट्स मुंबई या सारख्या संस्था तत्पर असून आपण प्रगती करून गावांसह आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा असा सल्ला वाचनालय अध्यक्ष व सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचे संचालक प्रकाश मेस्त्री यांनी दिला. यावेळी मोबाईलचा वापर कसा आणि किती करावा यावर शशिकांत नाटेकर तर विद्यार्थ्यांनी खडतर प्रवासातून मिळवलेले यश कौतुक कौतुस्पदच आहेत, पण आपल्या पाल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पालक उपस्थित राहण गरजेचे असते अशी खंत माजी सभापती हिमाली अमरे यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार संस्था सहसचिव सिध्देश गोलतकर यांनी मानले.

error: Content is protected !!