पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री मा. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवार, 22 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कणकवली शहरातील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्यातून जनसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. रक्ताची गरज भासणाऱ्या अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांसह विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदान ठरत असते. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजपा नेत्यांनी केले आहे. या उपक्रमामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा वाढण्यास मदत होणार असून अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

यासंदर्भात भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर आणि शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. एका रक्तदात्याच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक कर्तव्य पार पाडावे.
कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर रक्तदाते सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजहिताचे कार्य करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!