वैभववाडी (प्रतिनिधी) : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतर्फे यंदा ‘इकोफ्रेंडली गणपती व सजावट रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक उपक्रम, गणेशमूर्ती, सजावट, आरती व भक्तिभाव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या विषयानुसार ६० सेकंद ते १ मिनिट ६० सेकंद कालावधीची व्हिडिओ रील तयार करून ती नगरपंचायतीकडे सादर करावयाची आहे. स्पर्धेची कालमर्यादा १४ ते २६ सप्टेंबर २०२६ अशी आहे. स्पर्धेसाठी गणेश चतुर्थी स्वागत व आगमन, बाप्पांची आरास व सजावट, गणेश आरती व भक्तिभाव, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे विषय देण्यात आले आहेत. याशिवाय गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपला संदेश अथवा शुभेच्छा रीलच्या माध्यमातून मांडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास २ हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बॅनरवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन नगरपंचायतीने केले आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश प्रभावीपणे मांडणाऱ्या रील्स तयार करून या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे.










