खारेपाटण (प्रतिनिधी) : “यश हे केवळ गुणांचे नसते, तर ते मेहनत, जिद्द आणि सातत्याचे फलित असते,” या भावनेचा प्रत्यय देत शेठ न. म. विद्यालय, व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक व सर्वांगीण गुणवत्तेचा गौरव करणारा हा क्षण विद्यार्थांमधे उत्साह व प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे तसेच जिल्हा परिषद सदस्या प्राची इस्वलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच आदर्श विद्यार्थी व आदर्श विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेज विभागातील इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी “गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी दीपस्तंभ आहे,” असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर प्रमोद रावराणे यांनी प्रशालेला दहा हजार रुपये देणगी स्वरूपात भेट दिली. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर भविष्यातही उत्तुंग यश संपादन करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
या कार्यक्रमास खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर विश्वस्त देसाई, ए. डी. कांबळे, तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत,बक्षीस विभागप्रमुख महिंद्रे, अमृते, ज्येष्ठ शिक्षक कोकाटे, नाईक, गुरसाळे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरील आनंद,पालक व शिक्षकांचा अभिमान आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छांनी हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अविस्मरणीय ठरला.









