पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून समाजवादी व गांधीवादी चळवळीतील एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला आहे.
डॉ. सप्तर्षी यांना मधुमेहाचा त्रास होता. शनिवारी सकाळी अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि त्यांच्या असंख्य अनुयायांनी तीव्र शोक व्यक्त केला. समाजवादी विचारांचा प्रसार आणि समाजपरिवर्तनासाठी आयुष्यभर झटणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी युवकांना संघटित करून सामाजिक व राजकीय परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद) या संघटनेची स्थापना केली. युक्रांदच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवकांमध्ये लोकशाही, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांची बीजे रुजवली.
डॉ. कुमार सप्तर्षी हे प्रभावी लेखक, अभ्यासू विचारवंत आणि ओजस्वी वक्ते म्हणूनही परिचित होते. समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार आणि लोकशाही मूल्यांच्या ऱ्हासाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा त्यांच्या कार्यावर ठसा उमटलेला होता. ग्रामीण विकास, शिक्षण, युवकांचे सक्षमीकरण आणि लोकशाही हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने व जनजागृती मोहिमा राबवल्या.
९ ऑगस्ट १९७७ रोजी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९७८ मध्ये अहमदनगर शहर मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत त्यांनी विधानसभेतही समाजवादी विचारांची प्रभावी मांडणी केली.
समाजकारणाकडे परिवर्तनवादी दृष्टीने पाहणारे, लेखणी आणि कृती या दोन्ही माध्यमांतून समाजाला दिशा देणारे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अभ्यासू समाजचिंतक, संवेदनशील लेखक आणि परिवर्तनासाठी अखंड लढणारा लढवय्या कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.












