वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील दहावी परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणातील प्रमुख संशयित संजय कणिराम राठोड याला कणकवली येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तीन दिवसाची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर त्याला कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते.दरम्यान, पोलीस कोठडीत झालेल्या चौकशीत या प्रकरणासंदर्भातील काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती असून, आणखी काही जण या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान झालेल्या कथित कॉपी प्रकरणी उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड, हेत हायस्कूलचे शिक्षक संजयकुमार आडे आणि उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकपूर्व जामिनासाठी राठोड याने केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर गेल्या बुधवारी स्वतः वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलीस कोठडी दरम्यान पोलीस चौकशीत सुरुवातीला उत्तरपत्रिका आपणच लिहिल्याचे राठोड सांगत होता.मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आणखी काही नावे पुढे येत आहेत. या प्रकरणात अगोदर गुन्हा दाखल असलेला संजयकुमार आडे व संदीप लाड हे दोघेजण प्रश्न पत्रिकेचा मोबाईलवर फोटो काढून परीक्षा केंद्राच्या आवाराच्या बाहेर असलेल्या संजय राठोड यांच्याकडे पाठवत होते. तर राठोड यांनी कोळपे येथील एका मुलाकडून तीन पेपरच्या उत्तर पत्रिका लिहून घेत असल्याची माहिती पुढं आली आहे. पोलिसांनी संबंधित्यांची हस्ताक्षर तपासणी केली आहे. तर इतर चार पेपरच्या उत्तर पत्रिका स्वतः राठोड यांनी लिहिल्याचे समजते. उत्तर पत्रिका श्री आडे यांच्या परीक्षा आवाराबाहेर लावलेल्या गाडीत बसून लिहीत असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी श्री राठोड याचा मोबाईल जप्त केला असून या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली श्री आडे यांची गाडीही जप्त करण्यात येणार आहे. तर परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही च्या आधारे संशयास्पद रित्या आढळणाऱ्या व्यक्तीं पोलिसांच्या रडावर आहेत.
उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तरे मिळविण्यात आल्याचा माहिती मिळत आहे. या सर्व बाबींची पोलीस अधिक तपास करत आहेत. उत्तरपत्रिका लिहिणारी व्यक्ती अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत असल्याने, त्याबाबत पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाणार, याकडेही लक्ष लागले आहे.
संजयकुमार आडे अद्यापही पोलीसांच्या हाती लागले नाही..
गुन्हा नोंद होऊन तब्बल 23 24 दिवस उलटून हे संशयित आरोपी आडे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या कॉपी प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे












