खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आता ग्रामीण रुग्णालयात होणार

दशक्रोशितील नागरिकांना जलद व सुलभ रुग्णसेवेचा लाभ मिळणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अगदी लगत असलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता मोठा बदल होऊन त्याचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात होणार असल्याचे नुकतेच प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून खारेपाटण वासियांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून यामुळे येथील दशक्रोशीतील नागरिकांना अधिक जलद व सुलभ रुग्णसेवेचा लाभ मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य विभागाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने शासनाने हा निर्णय घेतला असून याकरिता सुमारे ३७ कोटी ३७ लाख रुपये एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्ह्यातील एकूण ९ प्राथमिक आरोग्य केंद्राचा यामध्ये समावेश असल्याची माहिती जि.प सदस्या प्राची ईसवलकर यांनी दिली.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेले अतिशय महत्वाचे प्रा.आ.केंद्र असून अपघात्रस्त रुग्ण, स्नेक बाइट रुग्ण, हृदयविकार चे रुग्ण व प्रसूती महिला रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याने (ओ.पी.डी) ची रुग्ण संख्या दिवसेदिवस वाढताना दिसत आहे. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग व मर्यादित तांत्रिक आरोग्य यंत्रणा यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र शासनाच्या नवीन बदल धोरणानुसार खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास येथील रुग्णांना अत्याधुनिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

खारेपाटण प्रा.आ.केंद्राचा ४ तालुक्यातील रुग्णांना फायदा
खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेणारे बहुतांश रुग्ण हे अन्य जिल्ह्यातील व तालुक्यातील असून शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका देवगड तालुका, वैभववाडी तालुका आणि कणकवली तालुका अशा ४ तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गावांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोयीचे ठिकाण ठरत असून येथील आरोग्य सेवेचा ते लाभ घेत आहेत. आजूबाजूच्या तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रे असून देखील ग्रामीण भागातील रुग्ण हा आरोग्य सेवेसाठी कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राधान्य देताना दिसत आहे. यावरून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालय होणे का गरजेचे आहे हे अधिक स्पष्ट होते. नव्या धोरणानुसार खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास सध्या असलेली ७ बेडची संख्या वाढवून ती ३० पर्यंत नेण्यात येणार असून सुसज्ज ऑपरेशन थिएटर व पुरेसा कर्मचारी वर्ग आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गांना निवासी संकुल याचा यामध्ये समावेश आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी व इतर अत्यावश्यक सुविधांसाठी सुमारे दीड कोटी रुपये एवढ्या निधीची खर्च येणार असल्याचे समजते. दरम्यान शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागातील आरोग्य विभागातील चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने व आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे खारेपाटण दशक्रोशीतील नागरीकडून स्वागत केले जात असून राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान खासदार नारायण राणे जिल्हाचे पालमत्री नामदार नितेश राणे आमदार निलेश राणे यांचे देखील येथील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!