पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल ; बांदा येथील घटनेने खळबळ
बांदा (प्रतिनिधी) : नातीगोती आणि विश्वासाला काळिमा फासणारी संतापजनक घटना बांदा शहरात उघडकीस आली आहे. आपल्याच नात्यातील एका ९ व्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला विविध आमिषे दाखवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या बांदा पोलिसांनी रात्री उशिरा सापळा रचून मुसक्या आवळल्या. अबुसाद इब्राहिम शहा (वय ३०, रा. बांदा मुस्लिमवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारी ओरोस जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही १४ वर्षांची असून ती गोवा राज्यातील सीमाभागातील एका शाळेत ९ व्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. आरोपी अबुसाद हा मुलीच्या जवळच्या नात्यातील होता. याचा गैरफायदा घेत तो गेल्या काही काळापासून तिला विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या घरी बोलवायचा. तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत तो तिच्यावर सातत्याने आणि वेळोवेळी अत्याचार करत होता. भीतीपोटी पीडित मुलगी हा छळ सहन करत होती. संशयित बांदा परिसरात मोलमजुरीची कामे करायचा.
गोवा राज्यातील शाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका सत्रामध्ये महिला समुपदेशकाकडे ही मुलगी व्यक्त झाली. तिच्या बोलण्यातून आणि वर्तनातून संशय आल्याने महिला समुपदेशकाने तिला बोलते केले असता पीडितेने आपल्यासोबत घडणारा हा भयानक प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून समुपदेशकही हादरून गेल्या. त्यांनी तात्काळ याची माहिती मुलीच्या पालकांना दिली.नात्यातीलच व्यक्तीने असा नीच प्रकार केल्याचे समजताच मुलीच्या पालकांनी थेट बांदा पोलीस ठाणे गाठले आणि संशयितविरोधात लेखी तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून बांदा पोलिसांनी तात्काळ हालचाली करत रात्री उशिरा मुस्लिमवाडी परिसरातून संशयित अबुसाद शहा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितावर पोक्सो आणि बाल लैंगिक अत्याचाराचे अन्य गंभीर कलमांन्वते गुन्हा दाखल केला आहे. संशयितला ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे बांदा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.












