नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वैभववाडीतील शिक्षक सज्ज
वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ओरस सिंधुदुर्गनगरी आणि गटसाधन केंद्र, शिक्षण विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता सहावी) बदललेल्या नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रमावर आधारित तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण दि. १४ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत माधवराव पवार विद्यालय, वैभववाडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. चार दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात नवीन शालेय अभ्यासक्रमाची रचना, अध्ययन निष्पत्ती, अभ्यासक्रमाची ध्येये व उद्दिष्टे, अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती, कृतीआधारित शिक्षण, सर्व विषयांचे एकात्मिक अध्यापन तसेच विद्यार्थीकेंद्रित अध्यापन-अध्ययन प्रक्रिया यांबाबत प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार अध्यापन अधिक प्रभावी आणि अनुभवाधारित कसे करता येईल, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, केंद्रप्रमुख विजय केळकर तसेच अमर पाटील यांनी भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. त्यांनी सुलभक व प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधत नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणासाठी गटसाधन केंद्र, पंचायत समिती वैभववाडीच्या समन्वयक म्हणून सरिता जाधव, स्नेहल रावराणे आणि तानाजी कांबळे यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्रशिक्षणास रामचंद्र घावरे, कलाशिक्षक मंदार चोरगे, रेश्मा लटपटे आणि मृणाल गोसावी यांनी सुलभक म्हणून कार्य केले. त्यांनी विविध उपक्रम, गटचर्चा, प्रात्यक्षिके आणि कृतीआधारित सत्रांद्वारे नवीन अभ्यासक्रमातील संकल्पना प्रशिक्षणार्थींना सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगितल्या.
या चार दिवसीय प्रशिक्षणामध्ये वैभववाडी तालुक्यातील पूर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणार्थी शिक्षक अंकुश सुतार यांनी प्रशिक्षण वर्गाच्या प्रारंभी उत्कृष्ट प्रार्थनेचे गायन करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रशिक्षणामुळे नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि आत्मविश्वास शिक्षकांना मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थी शिक्षक अनिल खांबल, राजश्री शेट्येयांनी व्यक्त केली. समन्वयक सरिता जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करत प्रशिक्षणाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात












