‘अलौकिक शक्ती’चा दावा फोल; ३५ वर्षांनंतर वयोवृद्धाचा लेखी कबुलीनामा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पडताळणीत दावे खोटे

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील भोईचे केरवडे येथील एका वयोवृद्ध व्यक्तीने गेली ३५ वर्षे अंगात ‘वारेसूत्र’ येत असल्याचा दावा करून नागरिकांच्या समस्या सोडवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या पडताळणीत त्याचे दावे खोटे ठरल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘माझ्याकडे कोणतीही अलौकिक शक्ती नाही. आर्थिक अडचणीमुळे लोकांची दिशाभूल करत होतो,’ असा लेखी कबुलीनामा देत यापुढे असे प्रकार करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले.

क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्स्प्रेसचे जनसंपर्क अधिकारी, ह्यूमन राईट्सचे पदाधिकारी आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी संबंधित व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्या दाव्यांची पडताळणी केली. यावेळी काल्पनिक कौटुंबिक समस्या सांगितल्यानंतर संबंधिताने ‘करणी’, ‘भूतबाधा’, ‘अतृप्त आत्मा’ अशा कारणांचा उल्लेख करत विविध उपाय सुचविले. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींविषयीही त्याने दावे केल्याने त्याचे कथित ‘दिव्यज्ञान’ फोल ठरल्याचा दावा समितीने केला.

यानंतर संबंधित व्यक्तीला जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच Drugs and Magic Remedies Act, 1954 मधील तरतुदींची माहिती देण्यात आली. भूतबाधा, करणी किंवा अलौकिक शक्तींचे दावे करून उपचार सुचविणे किंवा वैद्यकीय पात्रता नसताना आजाराचे निदान करणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो, असे त्याला समजावण्यात आले.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपण लोकांची फसवणूक केल्याची कबुली देत, यापुढे अंगात ‘वारेसूत्र’ येत असल्याचे सांगणार नाही, अशा प्रकारचे लोकांकडून प्रश्न स्वीकारणार नाही आणि आपल्या परिसरात त्याबाबतचा सूचना फलक लावणार असल्याचे लेखी दिले. त्याचे वय आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्याकडून माफीनामा घेण्यात आला असून, पुन्हा असे कृत्य न करण्याची ताकीद देण्यात आल्याचे समितीने सांगितले.

परिसरात जादूटोणा किंवा अलौकिक शक्तींच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्यास त्याची माहिती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यातील दक्षता अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.

error: Content is protected !!