१९८९च्या बॅचचा स्नेह मेळावा
३५ वर्षानंतर जपले स्नेहबंध….
देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथील शां. कृ.पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयातील बी. एड. च्या १९८९ च्या बॅचमधील मित्र मैत्रिणींचा तिसरा स्नेहमेळावा कळंबा जवळील (कोल्हापूर) उन्ने फार्म मध्ये झाला. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील स्नेहबंध या मेळाव्याने अगदी ३५ वर्षांनंतरही जपले. व्यावसायिक प्रशिक्षणानिमित्त महाराष्ट्राच्या अनेक भागातून अनेकजण देवगडमध्ये एकत्र आले. जेमतेम वर्षभर एकत्र राहिले; पण त्या काळात त्यांच्यातील ऋणानुबंधाची वीण इतकी मजबूत झाली की पस्तीस वर्षानंतरही ते सर्वजण १९८८-८९ मधील वर्गातच असल्यासारखे वागतात. आजच्या घडीला अनेकजण निवृत्त झालेत. काहीजण निवृत्तीच्या वाटेवर आहेत. काहींनी शिक्षण क्षेत्रात आपली ओळख बनवली आहे तर काहीजण अन्य क्षेत्रात स्वतःची ओळख कायम ठेऊन आहेत. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सगळेजण एकत्र आले. प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले. जगणे समृद्ध बनवायचे असेल तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांशी स्नेह कायम ठेवला पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. बी. एड. च्या मित्र मैत्रिणींचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे, त्यातील सर्वांशी सतत संपर्कात राहणे, स्नेहमेळाव्याचे नियोजन करणे, तो प्रत्यक्षात आणणे याची धुरा समर्थपणे पेलली ती पिकुळे (दोडामार्ग) येथील सदाशिव गवस यांनी. त्याबद्दल त्यांचे स्नेहमेळाव्यात सर्वांनी आभार मानले. करवीरनगरीत स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे मोहन भांदिगरे आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचेही सर्वांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले. प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्व मित्रमैत्रिणींनी श्री. भांदिगरे व त्यांच्या पत्नी अनुराधा भांदिगरे यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.यावेळी सौ.भांदिगरे यांनी सर्व मैत्रिणींना भेटवस्तू देऊन पाहुणचार केला. स्नेहमेळाव्याच्या सुरवातीला मोहन भांदिगरे यांच्या “थोडा उशीर झाला” या काव्यसंग्रहाचे तेथील साहित्यिक बाबूराव शिरसाट यांच्या हस्ते व उपस्थित मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. काव्यसंग्रहाची प्रेरणा, निर्मिती प्रक्रिया, काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी अनेकांनी घेतलेली मेहनत याबाबत श्री.भांदिगरे यांनी विस्ताराने माहिती दिली. वीणा पटवर्धन यांनी विज्ञानातील प्रयोगाच्या माध्यमातून मानसशास्त्र आणि जादू याचा मिलाफ उलगडून दाखवला. फार्म मधील निसर्गरम्य वातावरण, कोकणाचा आभास निर्माण करणारी आमराई, शुद्ध शाकाहारी सह तांबड्या पांढऱ्या रश्शाचे कोल्हापुरी जेवण आणि उत्तरोत्तर सुरस होत जाणाऱ्या महाविद्यालयीन गजालींनी स्नेहमेळावा यादगार ठरला. यावेळी मोहन भांदिगरे,संतोष वायंगणकर, संध्या वायंगणकर, जयंत साटम, वीणा पटवर्धन, गीता सावंत, सरोज तोरसेकर, चारुता काळे, सुनेत्रा कोळंबकर, संजय जोशी, विजय गावकर, तारका सावंत, कुंदा साटम, सखाराम मुळे, चारुता काळे,आनंदा जाधव, शांताराम कांबळे, शैलेंद्र अमनगी, अनिल लोके, थॉमस फर्नांडिस, अभय मुणगेकर, प्रकाश घाडी,अलका सातार्डेकर,दशरथ घाडी,गोपाळ गोडबोले,शिला डामरेकर,शरद आपटे,संजय देसाई,जगदीश धोंड,सदाशिव गवस,प्रकाश घाडी,राजदा सरमळकर,दादा रेडकर,अवधूत येनजी,भारती खडपकर,भरत गावडे.दिनेश आजगावकर, सी.आर.सावंत, प्रभाकर धुरी, लक्ष्मण आंबेरकर आदी उपस्थित होते.
पुढचा स्नेहमेळावा मालवणात
कुडाळ, माडखोल आणि कोल्हापूरनंतर आता पुढचा मेळावा मालवणमध्ये घेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. सुनेत्रा कोळंबकर, संजय जोशी, बाळू खानोलकर, विजय गावकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी या मेळाव्याची जबाबदारी स्वीकारली आहे.













