भ. ता. चव्हाण चौके हायस्कूलमध्ये शालेय मुलांना रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
चौके (प्रतिनिधी) : भ.ता चव्हाण हायस्कूल, चौके येथे रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वाहतूक पोलिसांच्या पथकाने विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
वाहन चालविताना वाहन परवाना (लायसन्स), हेल्मेट यांचे महत्त्व तसेच वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे अपघात, त्याचे दुष्परिणाम आणि दंडात्मक कारवाई याबाबत विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहेत, त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास ट्रॅफिक पी.आय. आरिफ मुल्ला मॅडम, पोलीस हवालदार महेंद्र देऊळकर, पोलीस हवालदार राहुल वेंगुर्लेकर, पोलीस शिपाई अजित पाटील, ज्ञानेश्वर कांदळगावकर व मंचक शिरडे उपस्थित होते. तसेच प्रशालेचे परुळेकर सर,यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक शिक्षक संघांचे माजी उपाध्यक्ष मोहन गावडे व पत्रकार नितीन गावडे देखील उपस्थित होते प्रशालेतील सर्व विद्यार्थी हॉलमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, “नियम पाळा, सुरक्षित राहा” हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.










