वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई (रजि.) ग्रामीण शाखा व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण शाखेचे अध्यक्ष आयु. भास्कर जाधव राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता उपस्थिती, ११ ते ११.३० या वेळेत धम्मध्वजारोहण व बुद्ध पूजापाठ, ११.३० ते १२ या वेळेत स्वागत व प्रास्ताविक होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत प्रा. प्रशांत हटकर यांचे ‘बाबासाहेबांची धम्मक्रांती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर धम्मप्रवचन होणार आहे.
दुपारी १ ते २ या वेळेत विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांचा सत्कार, २ ते ३ या वेळेत स्नेहभोजन, तर ३ ते ४ या वेळेत धम्मगीते व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व सातवी शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर व पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या नावांची यादी १० ऑक्टोबरपूर्वी ग्रामीण शाखेच्या सचिवांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचाच गौरव करण्यात येणार आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव रविंद्र पवार, अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले आहे.










