भारतामधील प्रमुख अॅक्वाकल्चर फीड उत्पादक कंपनी Deepak Nexgenच्या या केंद्राला मंत्री नितेश राणे यांची भेट
मत्स्य व कोळंबी पालनातील आधुनिक पोषण तंत्रज्ञानाचा अभ्यास; महाराष्ट्रातील अॅक्वाकल्चर क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त बाबींचा वापर करणार – मंत्री नितेश राणे
बोम्मुलुरू,एलुरू (प्रतिनिधी) : आंध्र प्रदेशच्या सागरी व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेल्या दौऱ्यादरम्यान मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बोम्मुलुरू, एलुरू जिल्हा येथील Nexgen Feeds या अत्याधुनिक उत्पादन व अॅक्वाकल्चर सोल्युशन्स केंद्राला भेट देऊन आधुनिक मत्स्य व कोळंबी पोषणामागील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली.
भारतामधील प्रमुख अॅक्वाकल्चर फीड उत्पादक कंपनी असलेल्या Deepak Nexgenच्या या केंद्रात कच्च्या मालाच्या प्रक्रियेपासून फीड निर्मिती व फॉर्म्युलेशन, गुणवत्ता तपासणी तसेच मत्स्यपालनासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध विशेष उत्पादनांपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी यावेळी करण्यात आली.
Nexgenच्या Kingfish आणि ifeed या ब्रँड्सअंतर्गत उपलब्ध उत्पादनांसोबतच Vannamei कोळंबीसाठी विशेष फीड, Functional Nutrition, Probiotics, Minerals, Feed Additives तसेच मत्स्यपालनातील आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी घेतली.
मत्स्य व कोळंबीची निरोगी वाढ, फीडचा कार्यक्षम वापर, सातत्यपूर्ण पोषण तसेच जलगुणवत्ता सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही यावेळी अभ्यास करण्यात आला. फीड उत्पादनापासून थेट मत्स्यपालनाच्या शेतापर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी समजून घेण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वैज्ञानिक पोषण, आधुनिक तंत्रज्ञान आणि मत्स्य शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व अॅक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, कार्यक्षमता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी या अभ्यास दौऱ्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्रात प्रभावीपणे उपयोग करण्याचा प्रयत्न राहील, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.









