तीन होड्या नदीपात्रात बुडवल्या
कुडाळ (प्रतिनिधी) : कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने गुरुवारी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूने भरलेल्या एकूण ५ होड्या आढळून आल्या असून, त्यापैकी ३ होड्या नदीपात्रात बुडविण्यात आल्या, तर २ होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी नेरूरपार जेटी परिसरात अचानक पाहणी केली. यावेळी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ५ होड्या रंगेहात आढळून आल्या. पथकाने तातडीने पावले उचलत ३ होड्या नदीपात्रातच बुडवून नष्ट केल्या, तर उर्वरित २ होड्या प्रवाहाच्या दिशेने सोडून दिल्या.
या धडक कारवाईत कुडाळ व पिंगुळीचे मंडळ अधिकारी, कुटगाव, नेरूर, चेंदवण आणि वालावल येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच संबंधित पोलिस पाटील प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी व अशा कारवाया केल्या जात आहेत. यापुढेही शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाळूचे उत्खनन अथवा वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.










