कळसुली इंग्लिश स्कूल मध्ये शालेय स्वराज्य सभेची निवडणूक उत्साहात संपन्न

कळसुली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल मधील EVM app द्वारे गुप्त मतदान पद्धतीने शालेय स्वराज्य सभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्वगुणांचा विकास तसेच शालेय प्रशासनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या उद्देशाने शालेय स्वराज्य सभेची निवडणूक उत्साहपूर्ण व लोकशाही पद्धतीने पार पडली.

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी सागर संतोष गावकर हा संपूर्ण शाळेतून बहुमताने निवडून आला. त्याचप्रमाणे प्राथमिक गटातून सौम्या सतीश सावंत, मनस्वी रणजीत दळवी आणि गायत्री प्रवीण दळवी तसेच माध्यमिक गटातून प्रियेश विलास घाडीगावकर, पुष्कर सुनील चव्हाण आणि सानिका रविंद्र नाधावडेकर व उच्च माध्यमिक गटातून प्रांजल सुनील परब आणि दर्शन पंढरीनाथ सावंत हे सदस्य म्हणून निवडून आलेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी विद्यार्थ्यांसमोर आपली भूमिका व उद्दिष्टे मांडली. त्यानंतर मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव, नेतृत्वक्षमता, संघभावना आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी तसेच भविष्यात जबाबदार नागरिक घडावेत या हेतूने शाळेत दरवर्षी शालेय स्वराज्य सभेच्या निवडणुका घेतल्या जातात. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमर पवार यांनी केले. निवडणूक यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यशस्वी उमेदवारांचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी अभिनंदन करून शालेय स्वराज्य सभेच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. शाळेचे कामकाज अधिक प्रभावी व सुरळीत चालण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी, मंत्रीमंडळ आणि सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय स्वराज्य सभेचे सर्व उमेदवार, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

error: Content is protected !!