आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या प्रतिनिधी मंगल कामत यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

7 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार पुरस्कार वितरण

34 वर्षांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्याचा होणार गौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनेलच्या बांदा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार श्रीमती मंगल शांताराम कामत यांना प्रतिष्ठेचा ‘स्टार आयकॉन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

भास्कर भूषण यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार श्रीमती कामत यांच्या ३४ वर्षांच्या समाजाभिमुख, निःस्वार्थ पत्रकारिता आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी गुन्हेगारी, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच जनहिताच्या विविध विषयांवर तीन हजारांहून अधिक बातम्या व विशेष लेख प्रकाशित केले आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे व न्यूज चॅनेलमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्स (डिसेंबर १९९३ ते डिसेंबर १९९४), दैनिक पुढारी (जानेवारी १९९५ ते २००३), दैनिक लोकमत (२००५ ते २००८), लाईव्ह सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल (२००९ ते ऑगस्ट २०१५), सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनेल (१ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑक्टोबर २०२२), माझा सिंधुदुर्ग न्यूज चॅनेल (२०२२ ते डिसेंबर २०२५) आणि १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनेलमध्ये त्या कार्यरत आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार (२०१४), सिंधुदुर्ग लाईव्हचे सलग तीन वर्षे ‘स्टार पत्रकार’ पुरस्कार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, महिला दिनानिमित्त सावंतवाडी सखी महिला संस्थेचा पुरस्कार, इंटरनॅशनल वुमन राईट पुरस्कार, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून विविध गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांच्या ‘माझा जीवन प्रवास’ या आत्मचरित्रालाही विशेष गौरव प्राप्त झाला आहे.

पत्रकारितेबरोबरच त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. ऑक्टोबर १९७८ ते जून १९८३ या काळात त्या कास येथे खातेबाह्य पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होत्या. २०१७ ते २०२२ या कालावधीत त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

गेल्या १५ वर्षांपासून बांदा पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीवर विनामोबदला सदस्य म्हणून कार्यरत राहून अनेक महिला व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच रोणापाल येथील दयासागर छात्रालयात (अखिल भारतीय सेवा अभियान, चेन्नई) गेल्या १४ वर्षांपासून विनामोबदला सेवा देत गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान दिले आहे.

याशिवाय मनोरुग्ण तज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांच्या सहकार्याने २०१७ पासून शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, तसेच कोळोशी येथील नारायण आश्रमामध्ये आरोग्य सेविका प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

श्रीमती मंगल शांताराम कामत यांना जाहीर झालेल्या **’स्टार आयकॉन पुरस्कारा’बद्दल आपला सिंधुदुर्ग न्यूज परिवार, पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!