सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका
सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आजगाव येथील रहिवासी सर्वेश महेश आजगावकर यांच्या अपघातग्रस्त हुंडाई वेरना कारच्या विमा भरपाई प्रकरणात एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून सुमारे १० लाख १७ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वसुली अर्ज दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती अॅड. दीपक अंधारी यांनी दिली.
आजगावकर यांच्या मालकीच्या गाडीचा अपघात दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी आरवली येथे झाला होता.त्या अपघातात गाडीची संपूर्णपणे मोडतोड होऊन गाडी पूर्णतः निकामी झाली होती.त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी श्री.आजगावकर यांनी विमा कंपनीकडे दाखल केलेला विमा दावा, विमा कंपनीने,ड्रायव्हरकडे योग्य प्रकारचे लायसन नाही, या कारणावरून फेटाळला होता. त्यावर श्री आजगावकर यांनी विमा कंपनीविरुद्ध मे ग्राहक आयोग सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार दावा अर्ज दाखल केला होता. त्या कामी आरटीओ सिंधुदुर्ग यानाही आवश्यक पक्षकार करण्यात आले होते.सदर दावा अर्जाची गुणदोषावर सखोल चौकशी होऊन मे.ग्राहक आयोगाने काढलेल्या निष्कर्ष अन्वये सर्वेश आजगावकर यांची तक्रार आयोगाने मान्य करून तक्रारदार यांच्या गाडीची इन्शुअर्ड डिक्लेड व्हॅल्यू ५ लाख ९१ हजार रुपये व सदर रकमेवर दावा अर्ज दाखल केल्यापासून संपूर्ण रक्कम वसुल होईपर्यंत दसादशे नऊ टक्के दराने व्याज वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातग्रस्त वाहन वाहून नेण्याकरिता झालेला क्रेन इत्यादी चा खर्च रुपये ४६ हजार,मानसिक त्रासापोटी रुपये वीस हजार याप्रमाणे रकमा व्याजासह वसूल करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती मलुस्टे ,सदस्य श्रीमती रसिका निकुंभ व सदस्य योगेश खाडीलकर यांनी दिले आहेत.
सदर आदेशाप्रमाणे विमा कंपनीने ४५ दिवसात तक्रारच्या रकमा न दिल्याने एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी यांचे विरुद्ध फौजदारी खटला व रक्कम रुपये दहा लाख वसुलीचा दरखास्त अर्ज तक्रारदार चे वतीने अँड.दीपक अंधारी यांनी जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाखल केला आहे.












