सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण, दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून मूक निषेध नोंदवित “NEET परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” तसेच “केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा” अशा आशयाचे फलक हातात घेत केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मौर्ये व विजय प्रभु, सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण आचरेकर, मधुकर लुडबे, सरदार ताजर, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, अभय शिरसाठ, जेम्स फर्नांडिस, अभय मालवणकर, भालचंद्र जाधव, तबरेज शेख, यश गाटे, दीपक पाडावे, पीटर फर्नांडिस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने तत्काळ ठोस भूमिका घेऊन शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखावा, अशी मागणी यावेळी केली.












