उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार विजेते बाळकृष्ण मसगे रविवारी ओरोसमध्ये

‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या व्यासपीठावर ठाकर लोककलेचा उलगडा; प्रात्यक्षिकांसह रंगणार संवाद

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या जागतिक कीर्तीच्या ठाकर लोककला परंपरेचा समृद्ध वारसा आणि तिच्या जतन-संवर्धनाचा प्रवास उलगडणारा विशेष कार्यक्रम रविवारी (ता. २६) ओरोस येथे होणार आहे. संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर झालेले युवा ककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे हे ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मासिक कार्यक्रमात रसिकांशी मुक्त संवाद साधणार असून ठाकर लोककलेचे प्रात्यक्षिकही सादर करणार आहेत.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाचा हा सतरावा मासिक कार्यक्रम ओरोस येथील खर्येवाडी (जैतापकर कॉलनी) येलोथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
दशावतार, चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या आणि पांगुळबैल यांसारख्या लोककलांनी पिंगुळीच्या ठाकर समाजाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. या परंपरेचे संवर्धन करणाऱ्या बाळकृष्ण मसगे यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्लाखान राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे वडील गणपत मसगे हेही प्रसिद्ध लोककलावंत असून त्यांच्याकडूनच त्यांनी या कलेचे संस्कार घेतले.

कार्यक्रमात बाळकृष्ण मसगे ‘ठाकर लोककला’ या विषयावर बोलताना या कलेचा इतिहास, विविध कलाप्रकार, लोककला आणि धार्मिक विधी यांचे नाते, चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांची निर्मिती प्रक्रिया, बदलत्या काळानुसार झालेली रूपांतरे तसेच ठाकर समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि आव्हाने यांचा वेध घेणार आहेत. याशिवाय पारंपरिक कलांचे प्रात्यक्षिकही ते सादर करणार आहेत.
मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून बी.एफ.ए. पदवी घेतल्यानंतर त्यांनी जवळपास दहा वर्षे चित्रपटसृष्टीत आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळ गावात परत येऊन चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आणि चामड्याच्या बाहुल्या या दुर्मिळ लोककलांच्या जतन व प्रसारासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांच्या पुढाकारातून पिंगुळी येथे ‘ठाकरवाडी म्युझियम’ या आगळ्यावेगळ्या आदिवासी पुरातन वस्तुसंग्रहालयाची उभारणीही करण्यात आली आहे.

कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून साहित्य, कला आणि लोकसंस्कृतीची आवड असलेल्या नागरिकांनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी केले आहे.

error: Content is protected !!