दूध व्यवसायात युवकांची वाढती पावले; ‘आदर्श दूध संस्था पुरस्कार’ जाहीर

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा बँक-गोकुळचे नियोजन; ‘श्वेतसंवाद’ उपक्रम राबविणार : मनीष दळवी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात युवकांचा वाढता सहभाग हा दिलासादायक असून, दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांनी व्यवसायवृद्धीचा संकल्प करून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास जिल्ह्यात दुग्धक्रांती घडू शकते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. यावेळी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आदर्श दूध संस्था पुरस्कार’ सुरू करण्यात येणार असून विजेत्या संस्थेला आकर्षक रोख पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवडक दूध उत्पादक संस्थांची दुग्ध उत्पादनवाढ नियोजनाबाबत बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
दळवी म्हणाले, जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी शेतकरी आणि दूध संस्थांमध्ये सातत्याने संवाद होणे गरजेचे आहे. गोकुळ दूध संघाने गेली १३ वर्षे तोटा सहन करतही सिंधुदुर्गातील दूध उत्पादकांना सेवा दिली आहे. त्यामुळे या संस्थेचे योगदान मोलाचे आहे. नवीन पिढीला दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी पूरक व्यवसायांची जोड देणे आवश्यक असून, जिल्ह्यात युवकांचा वाढता सहभाग भविष्यासाठी आशादायी आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘श्वेतसंवाद’ उपक्रम राबविण्यात येणार असून, संस्थांबरोबरच शेतकऱ्यांचेही वर्गीकरण करून त्यांच्या गरजेनुसार नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हा उपनिबंधक तथा गोकुळ प्रशासक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विद्यानंद देसाई, प्रभारी सहाय्यक निबंधक (दुग्ध) सुमती ढवण, गोकुळचे अधिकारी दयावर्धन कामत, धनाजी पाटील, आर. बी. दळवी, भारत मोळे, डॉ. नितीन रेडकर, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, डॉ. प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच जिल्ह्यातील विविध दूध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

बैठकीत गोकुळच्या उत्पादनांसाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून विक्री केंद्रे सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच दुग्ध व्यवसायाचा विस्तार, शेतकऱ्यांशी नियमित संवाद आणि उत्पादनवाढीसाठी विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले.

error: Content is protected !!