संदिप परब यांच्या नेतृत्वामुळे अनेक निराधारांच्या आयुष्यात आशेचा किरण

जीवन आनंद संस्थेच्या गोव्यातील तिसऱ्या ‘स्नेहदीप’ आश्रमाचे नानोडे येथे उद्घाटन उत्साहात

खारेपाटण (प्रतिनिधी) : निराधार, बेघर व्यसनाधीन आणि मतिमंद व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या गोव्यातील तिसऱ्या ‘स्नेहदीप’ आश्रमाचे” उद्घाटन रविवारी नानोडे, गोवा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्थानिक नागरिक, समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोवा विधानसभेचे आमदार चंद्रकांत शेट्टे यांनी,”आजच्या घोर कलियुगात निराधारांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य अत्यंत मोलाचे असून संदिप परब यांच्या नेतृत्वामुळे अनेक निराधारांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. तर
कार्यक्रमाच्या प्रारंभी जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त पारिशभाई यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, गोव्यातील अनेक निराधार व्यक्तींना आजवर पुनर्वसनासाठी कुडाळ येथील आश्रमात पाठवावे लागत होते. मात्र गोव्यातील दानशूर व दयाळू नागरिकांच्या सहकार्यामुळे आता स्थानिक पातळीवरच त्यांची सेवा व पुनर्वसन करणे शक्य झाले आहे. समाजाच्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी आपल्या मनोगतात गोव्यातील नागरिकांनी संस्थेला दिलेल्या प्रेम, माया आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “गोवेकरांचे विचार अत्यंत उदात्त आहेत. जो-जो निराधार आहे, तो आमचाच आहे.या भावनेतून आम्ही काम करतो. आज व्यसनाधीनता आणि मतिमंद व्यक्तींची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. त्यांच्यासाठी समाजाने एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गोव्यातील दोन्ही विद्यमान आश्रमांची क्षमता अपुरी पडत असून वाढत्या गरजांमुळे अधिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. संस्थेला कोणताही शासकीय राजाश्रय मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींनी व शासनाने या कार्याला पाठबळ द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक गोव्याचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी बोलताना “समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने योगदान द्यावे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या कार्याला राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर आवश्यक ते सहकार्य करू.तसेच विधानसभेत आगामी अधिवेशनात या विषया संदर्भातील प्रश्न मांडू.” असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन संस्थेच्या विश्वस्त पूनम बुर्ये यांनी केले. उपस्थितांनी नव्या ‘स्नेहदीप’ आश्रमाच्या माध्यमातून गोवा येथील अधिकाधिक निराधार व्यक्तींना आधार, सन्मान आणि नवे आयुष्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

error: Content is protected !!