महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे – रिया गांवकर

घाडीगांवकर समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महापुरुषांच्या विचारांचा जागर शाळांमध्ये व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करायला हवेत. तरच भारत देश महासत्ता बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध वकृत्वपटू रिया गांवकर हिने केले. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात रिया बोलत होती.

समाजात विवेकानंद घडायला हवेत, शिवबा घडवणाऱ्या माता दिसल्या पाहिजेत, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचं असं म्हणणारे नरवीर तानाजी दिसले पाहिजेत. तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होईल आणि उद्याचा महान भारत घडेल. महापुरुषांची जयंती साजरी करताना वाद्यांचा गजर नसावा तर विचारांचा जागर असावा असे रिया पुढे म्हणाली.

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई, संस्थेच्या सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने समाजातील इयत्ता १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथे नुकताच आयोजित केला. या कार्यक्रमात बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दीपक घाडी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने ड्रीम बुक बनवायला हवे आणि त्यातील स्वप्ने साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले. त्याशिवाय बँक भरती विषयी मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

याप्रसंगी मुंबई मध्यवर्ती उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, मध्यवर्ती कार्यकारीणी सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, सचिव प्रदीप घाडी, सहसचिव बुधाजी घाडीगांवकर, खजिनदार सुनील गांवकर, दत्तगुरु गावकर, प्रीतम घाडीगांवकर, आडेलकर गुरुजी, कळसुलकर गुरुजी, वागदे प्रकल्प कार्याध्यक्ष भांडुप विभाग सुनील घाडीगांवकर, संभाजी घाडीगांवकर, सुभाष गावकर, कैलास घाडीगावकर, जगन्नाथ घाडीगावकर, आप्पा गावकर, सहदेव घाडीगावकर, डॉ. जे. के. घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमा मध्ये किंजवडे येथील दुर्धर आजाराने अल्पवयात निधन झालेल्या कै. सत्यविजय घाडी (किंजवडे ) तसेच देवगड-जामसंडे येथे मोटरसायकल अपघातात निधन झालेल्या कै. मिलिंद घाडी (तळवडे) यांच्या कुटुंबियांना सिंधुदुर्ग विभागाच्या आपत्कालीन निधीतून आर्थिक मदत देण्यात आली. गेल्या शंभर वर्षात समाज संघटनेचे भरीव कार्य केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विजय गांवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष गांवकर यांनी केले.

error: Content is protected !!