प्रशालेतील एकूण ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या सन २०२६ च्या इयत्ता ७ वी व ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत येथील शेठ न.म.विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून इयत्ता ७ वी चे चार तर इयत्ता ४ थी चा एक अशा एकूण ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.पराडकर आराध्या समीर (२०० गुण),कर्ले दीक्षा किरण (१७८ गुण), बाणे निधी श्रीकृष्ण (१६८ गुण) आणि सलागरे समर्थ श्रीकांत (१५४ गुण) या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.तर इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक विभागातील कुमावत अन्वय देविदास या विद्यार्थ्याने (१६० गुण) मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई, प्रशांत गुळेकर, ए. डी. कांबळे, राजेंद्र वरूणकर, दिगंबर राऊत, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, शिक्षक नाईक, सर्व शिक्षकवृंद, यांजकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तर विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटणच्या शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा भर पडली असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.












