सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग, एनसीसी, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, विद्यार्थी कल्याण समिती आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करून “लेखन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे होते. प्रमुख वक्त्या प्रा. रश्मी देसाई यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वंचित, कष्टकरी व दुर्बल घटकांना दिलेला आवाज तसेच लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य, राष्ट्रप्रेम आणि लोकजागृतीसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींचे विचार आत्मसात करून लेखन, वाचन आणि चिंतनाची सवय जोपासावी तसेच समाजपरिवर्तनासाठी लेखणीचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.

मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन, लेखन, समाजसेवा आणि राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधून जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी बदलत्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक अध्ययन साधनांचा सकारात्मक वापर करून ज्ञान समृद्ध करावे, कौशल्ये विकसित करावीत आणि स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी प्रा. नमीरा मुजावर, प्रा. गौरी शेट्ये, प्रा. उत्कर्षा बाणे तसेच इतर प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी कु. जागृती चव्हाण, कु. माधुरी आडिवरेकर, कु. ऋषिकेश मोरे, कु. सुशांत पाजवे, कु. तेजश्री शेंगाळे व कु. मधुरा राऊत यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. जागृती चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋषिकेश मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. तेजश्री शेंगाळे यांनी मानले.

error: Content is protected !!