आपुलकीची ” राणे शैली “
मालवण (प्रतिनिधी) : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची आणि राणे कुटुंबाची जनतेशी बांधलेली घट्ट नाळ पुन्हा एकदा सिंधुदुर्गवासीयांना शुक्रवारी सायंकाळी पाहायला मिळाली.
शुक्रवारी दिवसभर कणकवली, ओरोस, मालवण आणि मसूरे अशा विविध ठिकाणी उद्घाटन व इतर प्रशासकीय कार्यक्रमांचा झंझावाती दौरा आटोपून महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे कणकवलीच्या दिशेने निघाले होते. दिवसभराच्या धावपळीनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता.
मसूरे येथील कार्यक्रम संपवून पालकमंत्री विरण नाक्यावरून जात असताना, राज्याचे माजी मुख्यमंत्री व व खासदार नारायण राणे यांचे खंदे आणि जेष्ठ कार्यकर्ते माजी जी. प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी उभे होते. मंत्री नितेश राणेंचा ताफा थांबताच कांदळकर यांनी साद घालत त्याना आग्रह केला, “साहेब, चहा घेऊनच जा!” मंत्रिपदाचे वलय आणि सुरक्षेचा ताफा सोबत असताना सहसा कोणी अशा आग्रहाला थांबत नाही, पण नितेश राणे वेगळ्या संस्कारात घडलेले आहेत. कार्यकर्त्याची आपुलकीची हाक ऐकताच मंत्रिमहोदयानी “तुमचा चहा टाकून कोण पुढे जाईल?” असे उदगार काढले.मंत्र्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांचे डोळे अभिमानाने भरून आले. नितेश राणे यांनी थेट कांदळकरांच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
हॉटेलच्या बाकावर बसून पालकमंत्र्यांनी अगदी घरच्यासारखा कुरकुरीत कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. तिथल्या स्थानिक ग्रामस्थांशी गप्पा मारत प्रत्येकाची आस्थेने चौकशी केली.यावेळी अनिल कांदळकर, माजी सरपंच आपु आंबेरकर, विलास पांजरी, अजयकुमार सर्वगोड, चुनवरे गावचे सुपुत्र व पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणेंपासून सुरु झालेला हा प्रेमाचा आणि विश्वासाचा वारसा आज पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे पुढे चालवत आहेत. पद आणि अधिकार येतात-जातात, पण कार्यकर्त्यांच्या शब्दाला आणि प्रेमाला दिलेला हा मानच ” राणे कुटुंबाला ” जनतेच्या हृदयात कायम स्थान मिळवून देतो. एका कार्यकर्त्याच्या शब्दासाठी गाडीतून उतरून चहा पिणारे पालकमंत्री नितेश राणे पाहून उपस्थितांनी “आपला माणूस तो हाच!” अशीच भावना व्यक्त केली.
चहा-भजीचा आस्वाद घेत आणि सर्वांचे आपुलकीने आभार मानत पालकमंत्री नितेश राणे पुढील नियोजित दौऱ्यासाठी कणकवलीच्या दिशेने रवाना झाले, पण त्यांच्या या साधेपणाची आणि आपुलकीची चर्चा मात्र यनिमित्ताने होत आहे.












