४५ वा वाढदिवस उत्साहात साजरा; सहकारातून सिंधुदुर्गच्या समृद्धीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प
ओरोस (प्रतिनिधी) : “आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू,” असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला. गेल्या साडेचार वर्षांत बँकेने १७ ते २० टक्क्यांपर्यंत व्यवसायवाढ साध्य करून व्यवसाय, नफा व उत्पन्न दुपटीपर्यंत नेण्यात यश मिळविले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहक, शेतकरी, महिला व युवकांना अधिक सक्षम सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात दळवी यांच्या ४५व्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, नागेश मोर्य, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, गणपत देसाई, विद्यानंद परब, विद्याप्रसाद बांदेकर यांच्यासह जिल्हाभरातील बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना दळवी म्हणाले की, वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा पुढील कामासाठी ऊर्जा देतात; मात्र त्याचबरोबर जबाबदारीही वाढवितात. शुभेच्छांसोबत व्यक्त होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या पदाचा उपयोग केवळ दैनंदिन कामकाजापुरता न करता समाजाच्या हितासाठी कसा करता येईल, याचा विचार करण्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांनी वेळोवेळी केले. त्यातूनच संस्थेच्या कामकाजाला व्यापक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ उपाध्याय, संजू परब, विद्यारसाद बांदेकर, गजानन गावडे, नागेश मोर्य यांनी विचार व्यक्त करीत दळवी यांच्या सहकारातील नेतृत्वाचे गुणगान गायले.












