वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे येथील माळरानावर चारण्यासाठी सोडलेल्या शेळ्यांच्या कळपाला जमिनीवर पडलेल्या विद्युतभारित वीजवाहिनीचा शॉक लागून दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही शेळ्या गंभीर जखमी झाल्या. शेळ्यांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मेंढपाळ शेतकरी बाबू शामू खरात यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
आचिर्णे पिंपळवाडी येथील शेतकरी बाबू शामू खरात हे शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांच्या मालकीच्या सुमारे ७० शेळ्या असून बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे त्या चारण्यासाठी त्यांनी आचिर्णे येथील माळरानावर नेल्या होत्या. यावेळी परिसरात आधीपासूनच विद्युतभारित वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली होती. चारताना शेळ्यांचा त्या तारेला स्पर्श होताच कळपातील शेळ्या तडफडू लागल्या.
शेळ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बाबू खरात यांनी पुढे धाव घेतली. मात्र त्यांचाही विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत दोन शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही शेळ्या गंभीर जखमी झाल्या.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाबू खरात यांना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर पशुवैद्यकीय अधिकारी हेदुळकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमी शेळ्यावर उपचार केले.तुटलेल्या वीजवाहिन्यांबाबत महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच शेळके यांचे झालेलेल्या नुकसानीची भरपाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.












