चौके (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालवण अंतर्गत बीट चौके क्र. १ च्या वतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त काळसे-धामापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रिया बावकर, धामापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी परब, काळसे गावच्या माजी सरपंच भावना मेस्त्री, माता-पालक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीट चौके क्र. १ च्या पर्यवेक्षिका भगत मॅडम यांनी केले. पंचायत समिती सदस्य रिया बावकर यांनी स्तनपानाचे आई व बाळाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. माजी सरपंच भावना मेस्त्री यांनी स्तनपानाबाबत माता तसेच कुटुंबातील सदस्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. सरपंच मानसी परब यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देत अशा जनजागृती उपक्रमांचे कौतुक केले. अंगणवाडी सेविका भांडारकर यांनी बाळाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवसांचे महत्त्व विषद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. काळसे-धामापूर येथील अंगणवाडी सेविकांनी स्तनपान गीत सादर केले, तर पेंडूर येथील अंगणवाडी सेविकांनी रोल प्ले सादर करून स्तनपानाविषयी प्रभावी जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका शीतल नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका वैशाली प्रभू यांनी केले.












