हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदानाचा प्रेरणादायी उपक्रम

२० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शहीद मेजरांना रक्तदानातून मानवंदना

वैभववाडी (प्रतिनिधी) : देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून शहीद मेजरांना अनोखी मानवंदना अर्पण केली. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद मेजर कौतुभ रावराणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी जि प सदस्य प्रमोद रावराणे, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे,माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, संचालक शरद रावराणे, सतीश रावराणे, विजय रावराणे, राजेश पडवळ, प्राचार्य के सी चव्हाण, अधिक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.

यानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (वैभववाडी), रावराणे मित्र मंडळ (वैभववाडी) आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी पंचक्रोशीतील युवक, नागरिक आणि रक्तदात्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!