खारेपाटण येथे जन शिक्षण संस्थानच्या वतीने कौशल्य विकासावर आधारित रोजगाराभिमुख प्रशिक्षण

खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे केंद्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय,भारत सरकार अंतर्गत जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ग्रामीण युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यात येत असून सन – २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात असिस्टंट पेंटिंग कोर्स,ड्रेस मेकिंग कोर्स,ब्युटिशियन कोर्स आणि हेल्पर वायरमन कोर्स शालेय अभ्यासक्रम बरोबरच खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी दिली. या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव – महेश कोळसुलकर, शिक्षिका सारिका महिंद्रे, सतीश नाईक, दयानंद कोकाटे, सुबोध देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमेश खरात, हेल्पर वायरमन असिस्टंट कोर्सचे प्रशिक्षक मा. शशिकांत मेस्त्री सर तसेच ड्रेस मेकिंग प्रशिक्षिका अंजली राऊत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य संजय सानप यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर सुधीर पालव यांनी शालेय विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, स्वयंरोजगारा च्या संधी आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी सन – २०२५ – २६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचाही गौरव करण्यात आला. हेल्पर, वायरमन अभ्यासक्रमाचे २१ विद्यार्थी तर ड्रेस मेकिंग अभ्यासक्रमाचे ४० विद्यार्थी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी जन शिक्षण संस्थानाचे हे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून, आगामी शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेऊन या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!