कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या वाटेवर विद्यार्थिनींच्या पंखांना बळ देत रोटरी क्लब कुडाळच्या वतीने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील २५ होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, माजी अध्यक्ष राजीव पवार, तसेच रोटरीचे पदाधिकारी प्रणय तेली, राजेश घाटवळ, डॉ. तायशेटे, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. राजवर्धन देसाई, डॉ. विनया बाड, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, अभिषेक माने, चव्हाण, डॉ. शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे यांनी रोटरी क्लब कुडाळच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांचे कौतुक केले. रोटरीचा जास्तीत जास्त निधी कोकणासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, भविष्यातही कोकणातील विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रणय तेली यांनी रोटरीच्या तालुका पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने दर्जेदार व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. राजेश घाटवळ यांनी रोटरीच्या इतिहासाची उजळणी करत पोलिओ निर्मूलन अभियानातील रोटरीच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती दिली. डॉ. तायशेटे यांनी रोटरी क्लबच्या सर्व उपक्रमांना भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून क्लबच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यात प्रथम आलेली शिवराज मराठा विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दुर्वा निलेश धुरी हिने आपल्या ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींना सायकली देऊन रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीचा जो वसा जपला आहे, तो आम्ही विद्यार्थी निश्चितपणे पुढे चालू ठेवू, असे आश्वासन तिने दिले. रोटरी क्लब कुडाळच्या वतीने कुमारी दुर्वा निलेश धुरी आणि सौ. वेदिका विवेक मांडकुलकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष राजीव पवार यांनी केले. डॉ. राजवर्धन देसाई व डॉ. शिल्पा पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष मकरंद नाईक यांनी आभार मानले.












