सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन ८ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या शिबिराला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध विभागांतील ६२३ रुग्णांची तपासणी, तर ३४८ विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.
या मेगा आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्या दिपलक्ष्मी पडते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक, सरचिटणीस सावळाराम अणावकर गुरुजी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उपअधिष्ठाता डॉ. श्रेयस बुरुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. संतोष फुपरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. स्वप्नील मालखेडे यांच्यासह डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्वंतरी यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी शिबिराची माहिती देताना सांगितले की, छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील अतिविशेषोपचार तज्ज्ञ या शिबिरासाठी उपलब्ध झाले होते. कार्डिओलॉजिस्टमार्फत हृदयाची २डी इको तपासणी करण्यात आली. नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबिद नाईक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रगती होत असल्याचे सांगत जिल्ह्यातील रुग्णांना इतरत्र संदर्भित करण्याचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा दर तीन महिन्यांनी होणारा मेगा आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिबिरासाठी कोल्हापूर येथील हृदयरोग, कार्डियाक सर्जरी, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, युरोसर्जरी आदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच सिंधुदुर्गातील युरोलॉजिस्ट आणि पडवे येथील कॅन्सरतज्ज्ञ उपस्थित होते.
शिबिरात कार्डिओलॉजिस्ट, कार्डिअॅक सर्जन, न्यूरोसर्जन, प्लास्टिक सर्जन, कर्करोग तज्ज्ञ, युरोसर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग, नेत्ररोग, दंत, हृदयरोग, मधुमेह, फुफ्फुसरोग, मानसोपचार, बालरोग आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
याशिवाय रक्तदाब, रक्तातील साखर, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, २डी इको, ईसीजी आणि विविध रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. शालेय मुलांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्ड नोंदणीची सुविधाही शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात आली.
विभागनिहाय तपासणीत मेडिसिन विभागात १३६, फुफ्फुसरोग २१, बालरोग ४१, त्वचारोग १८, मानसोपचार २८, सर्जरी ६६, अस्थिरोग ५३, नेत्रचिकित्सा ४८, कान-नाक-घसा २७, त्रिरोग १९, दंतशास्त्र २०, कार्डिओलॉजी ५७, कार्डियाक सर्जरी ५७, युरोसर्जरी २७, न्युरोसर्जरी ३, प्लास्टिक सर्जरी १ आणि ऑन्को सर्जरीच्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ६२३ लाभार्थी रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात १३३ एक्स-रे, ४७ सोनोग्राफी, १९ सीटी स्कॅन, ४१ हृदयाच्या २डी इको आणि १०८ रक्त तपासण्या, अशा एकूण ३४८ तपासण्या करण्यात आल्या. तसेच १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. जनरल सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया आणि स्त्रीरोग विभागातील गर्भाशय शस्त्रक्रियेच्या रुग्णांचे स्क्रीनिंगही करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) नितीन तुरनर यांनी मानले.












