कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत वार्ड क्रमांक 2 मधील वरचीवाडी माऊली देवस्थान येथे राहणाऱ्या समाजसेविका व भाजप मंडल उपाध्यक्ष संजना संजय सदडेकर, प्रल्हाद सावंत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून कणकवली येथील वरचीवाडी येथील माऊली देवस्थान परिसरात एस टी बस थांबा मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाकडून जारी करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी कणकवली कनेडी भिरवंडे नरडवे मार्गावरील माऊली देवस्थान येथे विनंती थांबा” फलक उभारून एसटी बस थांबविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन मंडळाने संबधित आगारांना सूचना देऊन माऊली देवस्थान येथे प्रवाशांना चढउतार करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आज दिनांक 08.08.2026 रोजी माऊली देवस्थान ‘विनंती थांबा’ या फलकाचे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने अनावरण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका प्रतीक्षा सावंत, माजी नगरसेवक रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, ऍड. अभिजीत सावंत, प्रल्हाद सावंत, प्रमिला सावंत, सुधीर धुमाळे, खेडेकर, धुमाळे परब परिवार आणि इतर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या बस थांबा मंजुरीमुळे मुरेडोंगरी नजिक वरचीवाडी माऊली देवस्थान येथील परिसरातील सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.












