तळेरे (प्रतिनिधी) : अंगणवाडी जानवली वाकाडवाडी येथे ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पंचायत समिती सदस्या महेश्वरी चव्हाण, जानवली गावचे सरपंच अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.राणे, आरोग्य सेविका श्रीम. चिंदरकर, आधारशिला तालुका समन्वयक अंकिता लोखंडे, आरोग्य विभाग आशा आणि ग्रामस्थांची विशेष उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेविका अर्चना लाड व माधुरी लाड यांनी उपस्थितांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमा दरम्यान अंगणवाडी पर्यवेक्षिका योगिता पई – पाटकर यांनी उपस्थित महिलांना स्तनपानाचे महत्त्व आणि आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी विविध पौष्टिक पाककृती, रानभाजी प्रदर्शन, रांगोळी व गरोदर महिला ओटीभरण असे विविध उपक्रमही घेण्यात आले.
समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. तर महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी मार्गदर्शन करताना आपलं बाळ सुदृढ आणि बुद्धिमान बनवण्याची प्राथमिक जबाबदारी ही प्रत्येक मातेची असते व त्यासाठी स्तनपान व पौष्टिक आहार याची माहिती प्रत्येक मातेला असणे गरजेचे असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात गरोदर, स्तनदा माता, किशोरी मुली व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी मदतनीस संचिता सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.












