कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे खुर्द खालचीवाडी येथे श्रीमती रुपाली राजाराम गिरकर यांच्या भातशेतीचे गवा रेड्यांच्या कळपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळणे खुर्द गावालगतच्या जंगल परिसरात १० ते १२ गव्यांचा कळप वावरत असून, रात्रीच्या वेळी हा कळप भातशेतीमध्ये घुसून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहे.
गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बेळणे खुर्द परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले असून, भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने लक्ष देऊन गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा तसेच बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी सरपंच अविनाश गिरकर यांनी केली.नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली यावेळी सरपंच अविनाश राजाराम गिरकर, उपसरपंच पंढरीनाथ चाळके, पोलीस पाटील राजेंद्र चाळके, ग्रामपंचायत सदस्य राजा चाळके, सत्यवान चाळके, लऊ चाळके, प्रकाश चाळके, प्रभाकर चाळके तसेच इतर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.












