तरंदळे येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिर; समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांची उपस्थिती

जि.प. योजनांसह मातृ-बाल आरोग्यावर विशेष मार्गदर्शन; गरोदर माता व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून महिला व बाल विकास विभाग आणि अंगणवाडी केंद्र तरंदळे क्रमांक १ यांच्या पुढाकाराने गरोदर माता, स्तनदा माता आणि पालकांसाठी मातृ-बाल आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील महिला व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्या तथा समाजकल्याण सभापती रुहिता तांबे प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मातांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “बाळाच्या जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान हेच बाळाच्या आरोग्याचे खरे कवच आहे. नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आईच्या दुधाला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक आईने स्तनपानाला प्राधान्य द्यावे.”

यावेळी योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी तसेच मातांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत तांबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गावाच्या विकासकामांसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत जिल्हा परिषदेच्या विविध महिला व बालकल्याण योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

महिला व बालकल्याण पर्यवेक्षक पै मॅडम यांनी गरोदर मातांनी घ्यावयाचा पौष्टिक आहार, दैनंदिन जीवनशैली आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सीएचओ रासम मॅडम यांनी बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात स्तनपानाचे महत्त्व पटवून देत विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती दिली.

सरपंच सुशील कदम यांनी सांगितले की, “आईचे दूध हे नवजात बालकासाठी अमृत आहे. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण होण्याबरोबरच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महिला व बालकांचा आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आरोग्य शिबिरांवर विशेष लक्ष दिले जाईल.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “चला, आपण सर्व मिळून स्तनपानाला प्रोत्साहन देऊ आणि निरोगी पिढी घडवू,” असा सामूहिक संकल्प केला.

या कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, सरपंच सुशील कदम, उपसरपंच शुभावली सावंत, महिला व बालकल्याण पर्यवेक्षक पै मॅडम, सीएचओ रासम मॅडम, माईणकर सिस्टर, आशा कार्यकर्त्या आशा कदम, मुणगेकर, अंगणवाडी सेविका सावंत, कदम, सामंत, पावसकर मॅडम, अंगणवाडी मदतनीस, अभय सावंत, वनिता कदम, शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक डोईफोडे सर, शिक्षक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र तरंदळे क्रमांक १, महिला व बाल विकास विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि ग्रामपंचायत तरंदळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

error: Content is protected !!